Irfan Pathan TOP 4 Semi Finalist Prediction: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेचा थरार सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. स्पर्धेतील पहिला सामना ७ फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे. या स्पर्धेचे आयोजन संयुक्तरित्या भारत आणि श्रीलंकेत केले जाणार आहे. याआधी २०२४ मध्ये झालेल्या आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने जेतेपदाचा मान पटकावला होता. आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघ जेतेपद राखण्याच्या प्रयत्नात असणार आहे. याआधी कुठल्याही संघाला मायदेशात टी-२० वर्ल्डकप जिंकता आलेला नाही. त्यामुळे भारतीय संघाकडे इतिहास घडवण्याची संधी असणार आहे. दरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने कोणते ४ संघ या स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार, याबाबत भविष्यवाणी केली आहे.

काय म्हणाला इरफान पठाण?

भारताचा माजी क्रिकेटपटू इरफाण पठाण सध्या समालोचकाच्या भूमिकेत आहे. स्टार स्पोर्ट्सवरील एका कार्यक्रमात बोलताना त्याने, कोणते ४ संघ आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार याबाबत भविष्यवाणी केली आहे. इरफान पठाणच्या मते, भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे ४ संघ टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकतात.

भारतीय संघाने २००७ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपदाचा मान पटकावला होता. त्यानंतर भारतीय संघाला दुसरं जेतेपद मिळवण्यासाठी १७ वर्ष वाट पाहावी लागली. अखेर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने जेतेपदाचा मान मिळवला. रोहितने टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. ही जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली होती. कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवचा रेकॉर्डही दमदार राहिला आहे. त्यामुळे भारतीय संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. तर आयसीसी स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियाचा देखील बोलबाला पाहायला मिळत असतो. इंग्लंडने देखील टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे.

याआधी कुठल्याही संघाला मायदेशात खेळताना टी-२० वर्ल्डकप जिंकता आलेला नाही. त्यामुळे भारतीय संघाने जर ही स्पर्धा जिंकली, तर हा देखील मोठा रेकॉर्ड असेल. यासह कुठल्याही संघाने ३ वेळा टी-२० वर्ल्डकप जिंकलेला नाही. त्यामुळे भारतीय संघाकडे इतिहास घडवण्याची संधी असणार आहे. भारतीय संघातील फलंदाज सध्या तुफान फॉर्ममध्ये आहेत. सूर्यकुमारसह, अभिषेक शर्मा आणि हार्दिक पांड्या यांनी दमदार कामगिरी केली आहे. तर गोलंदाजीत अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि वरूण चक्रवर्ती यांच्याकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.