पीटीआय, राजकोट
पहिल्या दोन सामन्यांत विजय मिळवल्यानंतर आत्मविश्वास दुणावलेल्या भारतीय संघाचा प्रयत्न इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात चमक दाखवत मालिकेत विजय आघाडी घेण्याचा असेल. या लढतीत कर्णधार सूर्यकुमार यादवच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असणार आहे.
गेल्या वर्षी सूर्यकुमारने संघाची सूत्रे स्वीकारल्यानंतर भारताने कामगिरी उंचावली. मात्र, सूर्यकुमारला धावा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ट्वेन्टी-२० मधील सर्वश्रेष्ठ फलंदाजांपैकी एक असलेल्या सूर्यकुमारने यादरम्यान १७ डावांत २६.८१च्या सरासरीने ४२९ धावा केल्या आहेत. सूर्यकुमारच्या खराब लयीमुळे त्याला चॅम्पियन्स करंडक एकदिवसीय स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले नाही. इंग्लंडविरुद्धच्या सध्या सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. त्यामुळे या सामन्यात त्याचा चांगल्या कामगिरीचा प्रयत्न असेल.
सॅमसन, तिलकवर नजर
सूर्यकुमारची खराब लय व संजू सॅमसनला आखूड टप्प्याच्या चेंडूंचा सामना करताना येणारी अडचण यामुळे दुसऱ्या सामन्यात भारत कठीण परिस्थितीत पोहोचला होता. मात्र, तिलक वर्माने संघाला विजय मिळवून दिला. दक्षिण आफ्रिकेत चमक दाखवणाऱ्या सॅमसनला जोफ्रा आर्चरने दोन लढतींत बाद केले. राजकोट येथील खेळपट्टी ही फलंदाजीसाठी अनुकूल समजली जाते आणि त्यामुळे शीर्ष फलंदाजी फळीला परिस्थितीचा फायदा घेऊन मोठी धावसंख्या उभारण्याची संधी आहे. आर्चर व मार्क वूड यांनी आखूड टप्प्याच्या चेंडूने भारतीय फलंदाजांना अडचणीत आणले. मात्र, तिलकने इंग्लंडची ही रणनीती निष्प्रभ ठरवली.
तिलकने दुसऱ्या सामन्यात आर्चरच्या गोलंदाजीवर चार षटकार लगावले. रिंकू सिंह व नितीश कुमार रेड्डी जायबंदी झाल्याने पुढील सामना खेळणार नाहीत. त्यांच्या जागी शिवम दुबे व रमनदीप सिंगला अंतिम अकरामध्ये स्थान मिळू शकते. पहिल्या दोन सामन्यांत अर्शदीप सिंग व हार्दिक पंड्या यांनी भारतासाठी नव्या चेंडूने गोलंदाजी केली. या सामन्यातदेखील हीच जोडी कायम राहण्याची शक्यता आहे.
●वेळ : सायं. ७ वा. ● थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी.