Queen Elizabeth II Death : लंडनमधील केनिंग्टन ओव्हल येथे सुरू असलेल्या इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या पहिला दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला होता. मात्र, राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळही स्थगित करण्यात आला आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर यासंदर्भात माहिती दिली आहे. ब्रिटीश इतिहासातील सर्वात जास्त काळ राज्य करणाऱ्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे काल (८ सप्टेंबर ) रोजी निधन झाले होते.

हेही वाचा – Queen Elizabeth II Death : कोहिनूर मुकुटाचे काय होणार? जाणून घ्या

इंग्लंड क्रिकेटकडून श्रद्धांजली

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने ट्वीट करत राणी एलिझाबेथ द्वितीय यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ”महारानी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाने क्रिकेट बोर्डाला खूप दुःख झाले आहे. क्रिकेटशी संबंधित असलेल्या सर्वांच्या संवेदना राजघराण्यासोबत आहेत.’, असे ट्वीट इंग्लंड क्रिकेट बोर्डातर्फे करण्यात आले आहे. तसेच ‘महारानी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनामुळे शुक्रवारी होणारा इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामना स्थगित करण्यात आला आला असून पुढील वेळापत्रक लवकरच येईल, असेही या ट्वीटमध्ये सांगण्यात आले आहे.

मालिका १-१ ने बरोबरीत

गुरुवारी ८ सप्टेंबरपासून इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामना सुरू होणार होता. मात्र, पावसामुळे पहिल्या दिवशीचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला होता. दरम्यान, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. पहिली कसोटी दक्षिण आफ्रिकेने एक डाव आणि १२ धावांनी जिंकली होती. तर दुसऱ्या कसोटीत इंग्लंडने एक डाव आणि ८५ धावांनी आफ्रिकेचा पराभव करत मालिकेत बरोबरी साधली.