सुनील गावस्कर यांना सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार
विराट कोहली पॉली उम्रीगर पुरस्काराने सन्मानित
सचिन आणि लक्ष्मण यांचा विशेष सत्कार
‘‘मी हा पुरस्कार माझ्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या क्रिकेटपटूंना समर्पित करतो. त्यांचे प्रेम, प्रोत्साहन आणि टीका नसती तर मला हे साध्य झाले नसते. याआधीच्या पुरस्कार विजेत्यांची यादी जरी पाहिली तरी हा सन्मान किती मोठा आहे, याची साक्ष पटते,’’ अशी प्रतिक्रिया भारताचा महान सलामीवीर फलंदाज आणि माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी प्रकट केली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) बुधवारी झालेल्या वार्षिक पुरस्कार वितरण समारंभात गावस्कर यांना कर्नल सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि २५ लाख रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
याशिवाय वर्षभर धावांचे इमले रचणारा युवा फलंदाज विराट कोहलीला यावेळी पॉली उम्रीगर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि ५ लाखांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याप्रसंगी कोहली म्हणाला की, ‘‘ज्यांचा खेळ पाहून मी लहानाचा मोठा झालो, त्यांच्यासमोर हा पुरस्कार स्वीकारताना स्वत:चा सार्थ अभिमान वाटत आहे. आगामी हंगामातही मी अशीच बहारदार कामगिरी करीत राहीन.’’

 ऑगस्ट महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करणारा भारताचा कसोटी फलंदाज व्ही.व्ही.एस. लक्ष्मणला बीसीसीआयकडून सन्मानित करण्यात आले. या सत्काराला उत्तर देताना लक्ष्मण म्हणाला की, ‘‘माझ्या भारतीय क्रिकेटसोबतचा १६ वर्षांचा प्रवास जरी आठवला तरी मी भावनिक होतो. खरे तर एक स्वप्नच मी जगलो. भारतीय क्रिकेटच्या सुवर्णकाळात मी संघाचा प्रतिनिधी होतो, याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो. या काळात भारताने मायदेशातच नव्हे तर परदेशातही आपला दबदबा निर्माण केला होता.’’
लक्ष्मण पुढे म्हणाला की, ‘‘हा संक्रमणाचा काळ आहे. न्यूझीलंडविरुद्धची मालिका आणि अहमदाबादच्या कसोटीमध्ये भारताने चांगली कामगिरी केली आहे. युवा खेळाडू संघाच्या जबाबदाऱ्या सांभाळू लागले आहेत. हा भारतीय संघ आम्हा सर्वाना अभिमान वाटेल अशी आणखी मोठी उंची गाठेल, या शुभेच्छा मी त्यांना देतो.’’
यंदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक साजरे करणारा सचिन तेंडुलकरचाही बीसीसीआयकडून विशेष गौरव करण्यात आला. या सत्काराप्रसंगी सचिन म्हणाला की, ‘‘माझे भारताकडून खेळण्याचे स्वप्न १९९९मध्ये साकारले. तेव्हापासून बीसीसीआय नेहमी माझ्या पाठीशी उभे होते. मी जेव्हा दुखापतग्रस्त व्हायचो, तेव्हाही बीसीसीआयचे मला सहकार्य करायचे. मी भारताचे माजी प्रशिक्षक जॉन राइट यांचाही आभारी आहे. २००२-०३मध्ये जोहान्सबर्गहून दरबानला विमानाने जात असताना राइट मला म्हणाले होते की, तू शतकांचे शतक पूर्ण करशील. मी त्यांना विनम्रपणे तेव्हा विचारले होते की ‘तुम्ही प्यायला आहात का?’ आता मी शतकांचे शतक पूर्ण करून उभा आहे. धन्यवाद राइट, तुमचा मी ऋणी आहे!’’
तेंडुलकर पुढे म्हणाला की, ‘‘ गावस्कर यांनाही नायडू पुरस्कार मिळाल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. गावस्कर यांचा खेळ पाहातच आम्ही मोठे झालो. लक्ष्मण यांची मैदानावरील भागीदारी आणि मैत्री नेहमीच लक्षात राहणारी आहे.’’ याशिवाय भारतीय क्रिकेटला दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल विजय र्मचट, दत्तू फडकर, विजय मांजरेकर, गुलाम अहमद, एम.एल.जयसिंहा आणि दिलीप सरदेसाई या सात माजी क्रिकेटपटूंना (मरणोत्तर) बीसीसीआयकडून मानचिन्ह आणि १५ लाख रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले  आहे.    
अन्य पुरस्कार विजेते
  माधवराव शिंदे स्मृती पुरस्कार (रणजी क्रिकेटपटूसाठी)
सर्वाधिक धावा : रॉबिन बिश्त (राजस्थान)
सर्वाधिक बळी : अशोक दिंडा (बंगाल)
  लाला अमरनाथ पुरस्कार (अष्टपैलू क्रिकेटपटूसाठी)
रणजी : स्टुअर्ट बिन्नी (कर्नाटक)
स्थानिक एकदिवसीय : लक्ष्मी रतन शुक्ला (बंगाल)
  एम. ए. चिदंबरम पुरस्कार
१६ वर्षांखालील : मोहम्मद सैफ (उत्तर प्रदेश)
१९ वर्षांखालील : विजय झोल (महाराष्ट्र)
२२ वर्षांखालील : सत्यम चौधरी (मध्य प्रदेश)
महिला क्रिकेटपटू : अनघा देशपांडे
  सर्वोत्तम पंच : एस. रवी
 सर्वोत्तम संघटना : दिल्ली क्रिकेट असोसिएशन