आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वामध्ये लॉर्ड्सच्या मैदानाला प्रचंड महत्व आहे. क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मैदानावर शतकी खेळी करावी असं अनेक क्रिकेटपटूंचं स्वप्न असतं. सध्या विराट कोहलीचा भारतीय क्रिकेट संघ कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर असला तरीही लॉर्ड्सवर पहिल्या कसोटी विजयासाठी भारताला दीर्घकाळ प्रतिक्षा करावी लागली होती. आजच्या दिवशी १९८६ साली तब्बल ११ अयशस्वी प्रयत्नांनंतर भारताने लॉर्ड्सच्या मैदानावर आपला पहिला कसोटी सामना जिंकला होता. या घटनेला आज ३२ वर्ष पूर्ण होत असून, मुंबईचे माजी खेळाडू दिलीप वेंगसरकर लॉर्ड्सवर भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले होते.

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारतीय संघाने पहिल्या डावाची सावध सुरुवात केली होती. अर्धशतकी भागीदारी झाल्यानंतर इंग्लंडची सलामीची जोडी फोडण्यासाठी भारतीय गोलंदाजांना यश आलं होतं. यानंतर इंग्लंडची मधली फळी फारशी चमकदार कामगिरी न करता माघारी परतली. मात्र ग्रॅहम गूचने डेरेक प्रिंगलच्या साथीने संघाचा डाव सावरत इंग्लंडला २९४ धावांपर्यंत मजल मारुन दिली. या डावात गूचने ११४ धावांची शतकी खेळी केली. इंग्लंडच्या या धावसंख्येला उत्तर देताना भारतीय संघाने दिलीप वेंगसरकर यांच्या शतकी खेळाच्या आधारावर ३४१ धावांपर्यंत मजल मारली. वेंगसरकरांच्या शतकी खेळीत १६ खणखणीत चौकारांचा समावेश होता.

पहिल्या डावात वेंगसरकरांनी केलेल्या शतकाच्या जोरावर भारताने इंग्लंडवर ४७ धावांची आघाडी घेतली. पुढे सामन्यात हीच आघाडी भारताला विजय मिळवून देण्यासाठी निर्णायक ठरली होती. दुसऱ्या डावात कपिल देव आणि मणिंदर सिंह यांच्या माऱ्यासमोर इंग्लंडचा संघ अवघ्या १८० धावांमध्ये माघारी परतला. त्यामुळे भारताला विजयासाठी १३४ धावांचं नाममात्र लक्ष्य मिळालं होतं. भारताने हे आव्हान ५ गडी गमावत पूर्ण केलं. दुसऱ्या डावातही वेंगसरकर यांनी ३३ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. इंग्लंडसारख्या देशात लॉर्ड्सच्या मैदानावर टिकाव लागणं ही कोणत्याही फलंदाजासाठी मोठी गोष्ट मानली जाते. अशा परिस्थितीत इंग्लिश तोफखान्याच्या मारा सहन करत वेंगसरकारंनी झळकावलेलं शतक आजही क्रीडा रसिकांच्या स्मरणात कायम आहे.