इंडियन क्रिकेट प्रीमियर लीगच्या (आयपीएल) माध्यम हक्कांचे लिलाव नुकतेच मुंबईमध्ये पार पडले. या लिलावामध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) विक्रमी पैसे मिळाले आहेत. २०२३ ते २०२७ या काळासाठी आयपीएलचे माध्यम हक्क ४८ हजार ३९० कोटी रुपयांना विकले गेले आहेत. यामुळे आयपीएल ही जगातील सर्वात जास्त कमाई करणारी दुसरी क्रीडा स्पर्धा ठरली आहे. बीसीसीआय आपली ही बक्कळ कमाई कशा प्रकारे खर्च करणार आहे, याबाबत आता अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

आयपीएलच्या लिलावातून मिळालेल्या पैशांचा वापर क्रिकेटच्या वाढीसाठी आणि विकासासाठी खर्च करणार असल्याचे, बीसीसीआयने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. आयपीएल फ्रँचायझी, खेळाडू, राज्य संघटना आणि कर्मचारी यांसारखे घटक या सर्व कमाईचा वाटा मिळविण्यासाठी पात्र असतील, असे बीसीसीआय सचिव जय शाह यांनी सांगितले आहे.

हेही वाचा – प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर ‘या’ खेळाडूला मिळाली भारतीय संघात जागा

शाह यांनी केलेल्या ट्विटनुसार, ४८ हजार ३९० कोटी रुपयांपैकी निम्मी रक्कम मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या आठ मूळ फ्रँचायझींमध्ये वितरित केली जाईल. या आठ संघांपैकी प्रत्येकाला सुमारे तीन हजार कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. तर, गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन नवीन संघांना ही रक्कम मिळण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.

एकूण रकमेतील उर्वरित अर्धी रक्कम म्हणजे, २४ हजार १९५ कोटी रुपये खेळाडू आणि राज्य संघटनांना वितरीत केली जाणार आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अर्ध्या रकमेतील २६ टक्के रक्कम देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये वितरीत केले जाणार आहे. तर, उर्वरित ७४ टक्क्यांपैकी चार टक्के कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी दिला जाईल. शेवटी राहिलेली ७० टक्के रक्कम विविध राज्य संघटनांना दिली जाईल. आकडेवारीनुसार, अंदाजे सहा हजार २९० कोटी रुपये खेळाडूंना वितरीत केले जातील. तर, अंदाजे १६ हजार ९३६ कोटी रुपये राज्य क्रिकेट मंडळांना मिळतील.