Sunil Gavaskar On Jasprit Bumrah: आयपीएल २०२६ स्पर्धेतील ४७ वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या लखनौकडून मिचेल मार्श आणि निकोलस पूरन यांनी मिळून दमदार सुरुवात करून दिली. पहिल्या डावात फलंदाजी करताना लखनौने २० षटकांअखेर २२८ धावा केल्या. या सामन्यातही जसप्रीत बुमराह गोलंदाजीत संघर्ष करताना दिसून आला. यादरम्यान त्याने १४ व्या षटकात २ नो चेंडू टाकले. यावर भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर आणि समालोचक सुनील गावसकर यांनी जोरदार टीका केली आहे.
तर झाले असे की, मुंबई इंडियन्सची गोलंदाजी सुरु असताना १४ वे षटक टाकण्यासाठी जसप्रीत बुमराह गोलंदाजीला आला. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर हिम्मत सिंग फलंदाजी करत होता. हा चेंडू हिम्मत सिंगच्या बॅटची कडा घेऊन रायन रिकल्टनच्या हातात गेला. रिकल्टनने पॅव्हेलियनची वाट धरली होती. पण नेमका हा नो चेंडू होता. त्यानंतर त्याने फ्री हिटचा चेंडू वाईड टाकला. याच षटकात त्याने आणखी एक नो चेंडू टाकला. हे पाहून सुनील गावसकर संतापले.
समालोचन करत असलेले सुनील गावसकर म्हणाले, “हे अजिबात चालणार नाही.. तू एक व्यावसायिक क्रिकेटपटू आहेस. वाईड चेंडू टाकला तर मी समजू शकतो, पण नो-बॉल टाकणं हे स्पष्टपणे चुकीचं आहे आणि ते खपवून घेतलं जाणार नाही.”
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या लखनौ सुपर जायंट्स संघाला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. जोश इंग्लिस १३ धावा करत माघारी परतला. तर मिचेल मार्श आणि निकोलस पूरनने मिळून संघाचा डाव सावरला. दोघांनी मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली. मार्शने ४४ धावा केल्या. तर पूरनने सर्वाधिक ६३ धावांची खेळी केली. कर्णधार ऋषभ पंतने १५ धावा केल्या. तर एडेन मारक्रमने नाबाद ३१ धावांची खेळी केली. शेवटी हिम्मत सिंगने ४० धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर लखनौ सुपर जायंट्सने २२८ धावांचा डोंगर उभारला.
