भारताची अष्टपैलू क्रिकेटपटू दीप्ती शर्माचे मत

अन्वय सावंत, लोकसत्ता

मुंबई : ऑस्ट्रेलियातील महिला बिग बॅश लीग, तसेच इंग्लंडमधील ‘द हंड्रेड’ यांच्यासारख्या स्पर्धामुळे महिला क्रिकेटला चालना मिळत असून महिलांच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटचे आयोजन करण्याची हीच योग्य वेळ आहे, असे मत भारताची अष्टपैलू क्रिकेटपटू दीप्ती शर्माने व्यक्त केले.

‘‘महिलांचे ‘आयपीएल’ क्रिकेट लवकर सुरू होणे आवश्यक आहे. परदेशात महिलांच्या बिग बॅश लीग आणि द हंड्रेड यांसारख्या स्पर्धाचे आयोजन केले जाते. ‘द हंड्रेड’च्या आधी इंग्लंडमध्ये किया सुपर लीग व्हायची. या स्पर्धामुळे जगभरातील महिला क्रिकेटपटूंना आपल्यातील प्रतिभा आणि गुणवत्ता दाखवण्यासाठी मोठे व्यासपीठ मिळते,’’ असे दीप्ती म्हणाली. ‘सोनी सिक्स’वर प्रक्षेपित होत असलेल्या महिला बिग बॅश लीगमध्ये यंदा दीप्तीसह स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांसारख्या एकूण आठ भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. भारतीय ट्वेन्टी-२० संघात दीप्ती विजयवीरची भूमिका बजावते. बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडर संघाकडूनही ती अखेरच्या षटकांत फलंदाजी करत असून हा अनुभव भारतासाठी खेळताना फायदेशीर ठरेल असे तिला वाटते. ‘‘विजयवीर म्हणून अधिक परिपक्व होण्यासाठी महिला बिग बॅश लीगचा मला नक्कीच फायदा झाला आहे. मी ज्या क्रमांकावर फलंदाजी करते, तिथे मला सामने जिंकवण्याची संधी मिळते. त्यामुळे नाबाद राहून विजयवीरची भूमिका चोख बजावत संघाच्या विजयामध्ये योगदान देण्याच्या मानसिकतेने मी खेळपट्टीवर उतरते,’’ असे दीप्तीने नमूद केले.