‘हा वर्ल्डकप आहे. करो या मरो असा सामना आहे, त्याचं गांभीर्य पाळायला हवं’ अशा शब्दात सुनील गावस्कर यांनी कोलकाता इथल्या इडन गार्डन्स मैदानावर सामन्यादरम्यान सुरू असलेल्या लेझर शो वर टीका केली आहे. टी२० वर्ल्डकप स्पर्धेतला भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला सुपर८ गटाचा सामना सुरू आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल तो सेमी फायनलमध्ये प्रवेश करणार आहे.
वेस्ट इंडिजने दिलेल्या १९६ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने पॉवरप्लेच्या ६ षटकात ५३/२ अशी मजल मारली. यानंतर ड्रिंक्स ब्रेक घेण्यात येतो. अडीच मिनिटांच्या या ब्रेकमध्ये प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ खेळाडूंशी चर्चा करतात. त्यांना मार्गदर्शन करतात. पुढच्या षटकांसाठी रणनीती आखली जाते. मात्र इडन गार्डन्स मैदानावर या अडीच मिनिटात लेझर शो सुरू करण्यात आला. अडीच मिनिटांकरता मैदानातले लाईट टॉवर बंद करण्यात आले.
‘सामना सुरू असताना असे लाईट घालवणं योग्य नाही. अडीच मिनिटात पुन्हा लाईट टॉवर सुरू झाले. खेळाडूंची लय हरवू शकते. लाईट असताना अचानक अंधार होते. काही मिनिटात पुन्हा प्रकाश हे डोळ्यांसाठी योग्य नाही. हा वर्ल्डकपचा सामना आहे. याच्या निकालावर बरीच समीकरणं अवलंबून आहेत. आयपीएल स्पर्धेत लेझर शो होतो. ते समजू शकतो. पण इथे नाही’, अशा शब्दांत गावस्कर यांनी लेझर शो वर खरमरीत टीका केली आहे.
त्याचवेळी समालोचन कक्षात माजी कर्णधार रवी शास्त्रीही होते. त्यांनीही गावस्कर यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. ‘अचानक लाईट चालू बंद करणं खेळाडूंच्या दृष्टीने अजिबातच योग्य नाही. वर्ल्डकपचा इतका निर्णायक सामना सुरू असताना हा प्रकार नको’, असं शास्त्री म्हणाले.
योगायोग म्हणजे भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत. लाखभर क्षमतेचं इडन गार्डन्स हे देशातल्या सर्वोत्तम मैदानांपैकी एक आहे. भारत-वेस्ट इंडिज लढतीलाही मैदान खचाखच भरलं आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ब्रेकदरम्यान लेझर शो आयोजित करण्यात येतो. मात्र खेळाडूंच्या आरोग्याचा, एकाग्रतेचा विचार केला जात नाही.
आयपीएल स्पर्धेदरम्यान ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेलने लेझर शो वर टीका केली होती. मात्र तरीही लेझर शो बंद झाले नाहीत.
