Team India Turning Point In ICC T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारतीय संघाने न्यूझीलंडला पराभूत करून जेतेपदाचा मान पटकावला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ९६ धावांनी विजय मिळवला आणि तिसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली. भारताने या स्पर्धेतील साखळी फेरीतील सामन्यांमध्ये एकही सामना गमावला नव्हता. त्यानंतर सुपर ८ फेरीत दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यत भारताचा दारूण पराभव झाला होता. त्यानंतर भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या वाटेवर होता. नेमकं तेव्हाच गौतम गंभीर आणि सूर्यकुमारने घेतलेल्या निर्णयामुळे भारतीय संघाचं नशीब पालटलं. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

कधी कधी पराभव होणंही चांगलं असतं. असंच काहीसं भारतीय संघाच्या बाबतीतही घडलं. भारताने साखळी फेरीतील सर्व सामने जिंकले. यादरम्यान भारताचा सामना बलाढ्य संघाविरूद्ध झाला नव्हता. पण दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या सामन्यात धावांचा पाठला करताना भारतीय फलंदाजी ढेपाळली. या सामन्यात भारतीय संघाला आपली मोठी चूक समजली. जर या सामन्यात ही चूक समजली नसती, तर सेमी फायनल किंवा फायनलमध्ये भारताला ही चूक महागात पडली असती. गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादवने चूक सुधारली आणि संघात आवश्यक बदल केले. त्यामुळे भारतीय संघाने एकतर्फी विजयाची नोंद केली.

सुपर ८ फेरीत अभिषेक शर्मा आणि इशान किशन हे दोन्ही फलंदाज पावरप्लेमध्ये ऑफ स्पिनरविरूद्ध फलंदाजी करताना अडचणीत सापडत होते. विरोधी संघ भारतीय संघाला अडचणीत टाकण्यासाठी ऑफ स्पिनरचा सहारा घेत होते. यावर तोडगा काढण्यासाठी गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादवने फलंदाजीक्रमात बदल केला आणि संजू सॅमसनचा संघात समावेश केला. संजू आणि अभिषेक शर्मा सलामीला, तर इशान किशनला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय भारतासाठी फायदेशीर ठरला.

वर्ल्डकप जिंकल्यानंतर संजू सॅमसनने याबाबत खुलासा केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुपर ८ फेरीत दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यातील पराभवानंतर, जिममध्येच गौतम गंभीरने संजू सॅमसनला सांगितलं होतं की तो इथून पुढे होणाऱ्या सामन्यांमध्ये तो खेळणार आहे.

संजू सॅमसन म्हणाला, “गौतम भाई माझ्याकडे आले आणि मी जिममध्ये असताना मला म्हणाले, संजू तयार राहा. तुला पुढील सामना खेळण्याची संधी मिळणार आहे. मी तर तयारच होतो. खरं सांगू तर, स्वत:च्याच सहकाऱ्यांसोबत जागेसाठी स्पर्धा करणं मला आवडत नाही. पण संघ म्हणून एकत्र आलो की, मी माझं सर्वोत्तम योगदान देतो. न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेत मी प्लॉप राहिलो. कारण जेव्हा मी संघातील जागेसाठी इतर सहकाऱ्यांशी स्पर्धा करतो, तेव्हा माझी कामगिरी चांगली होत नाही.” संधी मिळाल्यानंतर संजूने मागे वळून पाहिलं नाही. वेस्ट इंडिजविरूद्ध खेळताना त्याने नाबाद ८७ , इंग्लंडविरूद्ध खेळताना ८९ आणि फायनलमध्ये न्यूझीलंडविरूद्ध ८९ धावांची खेळी करून प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार पटकावला.