India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील हाय व्हॉल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. हा सामना श्रीलंकेतील आर.प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांनी आपल्या सुरूवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये दमदार विजयाची नोंद केली आहे. हा सामना जिंकून दोन्ही संघांना सुपर ८ मध्ये आपलं स्थान निश्चित करण्याची संधी असणार आहे. भारतीय संघाचे आतापर्यंत झालेले दोन्ही सामने श्रीलंकेत खेळवले गेले आहेत. तर हा सामना श्रीलंकेते खेळवला जाणार आहे. त्यामुळे खेळपट्टीनुसार, भारतीय संघाच्या प्लेईंग ११ मध्ये बदल पाहायला मिळू शकतो. भारतीय संघात फिरकी गोलंदाजांना संधी दिली जाऊ शकते.

कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये होणाऱ्या सामन्यात फिरकी गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळू शकतो. त्यामुळे भारतीय संघात कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि वरूण चक्रवर्ती यांसारख्या गोलंदाजांचा वापर केला जाऊ शकतो. या सामन्यात फिरकी गोलंदाजांची जादू पाहायला मिळेल, असा अंदाज आहे. पण भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीची जादू देखील पाहायला मिळू शकते. भारत- पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये झालेल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत हार्दिक पांड्या अव्वल स्थानी आहे. हार्दिकला पाकिस्तानविरूद्ध ९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने सर्वाधिक १५ गडी बाद केले आहेत. पाकिस्तानविरूद्ध खेळताना धावा खर्च करून ३ गडी बाद ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.

पाकिस्तानविरूद्ध खेळताना सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराह दुसऱ्या स्थानी आहे. बुमराहने ७ सामन्यांमध्ये ९ गडी बाद केले आहेत. तर कुलदीप यादवने ३ सामन्यांमध्ये ८ गडी बाद केले आहेत. तर अक्षर पटेलने ५ सामन्यांमध्ये ५ गडी बाद केले आहेत. तर वरूण चक्रवर्तीने ४ सामन्यांमध्ये ३ गडी बाद केले आहेत. पाकिस्तानविरूद्ध खेळताना हार्दिक पांड्याने फलंदाजी आणि गोलंदाजीतही दमदार कामगिरी केली आहे. याआधी ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजरबानीने ४ तर इवांसने ३ गडी बाद केले होते. त्यामुळे हार्दिक पांड्या देखील या सामन्यात चांगली कामगिरी करून पाकिस्तानवर भारी पडू शकतोय.

भारतीय संघाने स्पर्धेतील पहिल्या सामन्यात अमेरिकेचा पराभव केला होता. या सामन्यात भारतीय फलंदाज फ्लॉप ठरले होते. पण सूर्यकुमार यादवने भारतीय संघाचा डाव सांभाळला होता. हा सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात नामिबियाचा एकतर्फी पराभव केला. तर पाकिस्तानने स्पर्धेतील पहिल्या सामन्यात नेदरलँड्सवर विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात अमेरिकेवर विजय मिळवला. आता तिसरा सामना जिंकून कोणता संघ सुपर ८ फेरीत आपलं स्थान निश्चित करणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.