पीटीआय, बँकॉक
भारतीय पुरुष संघाने थॉमस चषक बॅडिमटन स्पर्धेची पदकनिश्चिती करीत इतिहास घडवला आहे. आता रविवारी १४ वेळा विजेत्या इंडोनेशियाला हरवून सुवर्णाध्याय लिहिण्याचा निर्धार भारतीय संघाने केला आहे.
भारतीय संघ गटसाखळीत फक्त चायनीज तैपेईला हरवण्यात अपयशी ठरला होता, परंतु जर्मनी आणि कॅनडा संघांना हरवून बाद फेरी गाठली. मग उपांत्यपूर्व फेरीत मलेशिया आणि उपांत्य फेरीत डेन्मार्कसारख्या कसलेल्या संघांना नमवून या प्रतिष्ठेच्या स्पर्धेची प्रथमच अंतिम फेरी गाठणाऱ्या भारताला कमी लेखून चालणार नाही. दुसरीकडे, आकडेवारीला अनुरूप कामगिरी करीत इंडोनेशियाचा संघ यंदाच्या थॉमस चषक स्पर्धेत अपराजित राहिला आहे. गटसाखळीत दक्षिण कोरिया, थायलंड आणि सिंगापूरला धूळ चारणाऱ्या इंडोनेशियाने उपांत्यपूर्व फेरीत चीन आणि उपांत्य फेरीत जपानला पराभूत केले आहे.
भारतीय संघाची एकेरीत किदम्बी श्रीकांत आणि एचएस प्रणॉय यांच्यावर प्रमुख भिस्त आहे. या दोघांनी स्पर्धेतील आपले पाचही सामने जिंकले आहेत. देशातील सर्वोत्तम दुहेरीची जोडी मानल्या जाणाऱ्या सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्यावर दुहेरीची मदार आहे. कृष्णा प्रसाद गर्गा आणि विष्णुवर्धन गौड पंजाला या युवा जोडीने मलेशिया व डेन्मार्कविरुद्ध कडव्या झुंजीनंतर पराभव पत्करले. त्यामुळे अंतिम सामन्यासाठी एमआर अर्जुन आणि ध्रुव कपिला यांना दुसरी दुहेरीची जोडी म्हणून संधी मिळू शकते.
जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावरील लक्ष्य सेन स्पर्धेच्या सुरुवातीला झालेल्या अन्न विषबाधेतून सावरत आहे. या स्पर्धेत तो अपेक्षित कामगिरी करू शकलेला नाही. मलेशिया आणि डेन्मार्कविरुद्धच्या अखेरच्या दोन्ही सामन्यांत त्याने पराभव पत्करला. अंतिम फेरीत लक्ष्यचा सामना जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावरील अँथनी सिनिसुका गिनटिंगविरुद्ध आहे. मार्च महिन्यात लक्ष्यने अँथनीला सरळ गेममध्ये हरवले होते. याच कामगिरीची त्याला पुनरावृत्ती करावी लागणार आहे.
श्रीकांतचा जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावरील जोनाटन ख्रिस्टीशी सामना होण्याची शक्यता आहे. श्रीकांत-ख्रिस्टी यांचे आतापर्यंतच्या नऊ सामन्यांत ४-५ असे विजयप्रमाण आहे. उपांत्य सामन्यात पाय मुरगळलेला प्रणॉय दुखापतीतून सावरत खेळल्यास क्रमवारीत २४व्या क्रमांकावरील शेसार हिरेन ऱ्हुस्ताव्हिटोशी त्याची गाठ पडेल. क्रमवारीत २३व्या क्रमांकावरील प्रणॉयने शेसारला आतापर्यंतच्या दोन्ही लढतीत पराभूत केले आहे. सात्त्विक-चिराग जोडीपुढे केव्हिन संजाया सुकामुल्जो, मोहम्मद एहसा आणि हेंड्रा सेटियावान या तीन खेळाडूंपैकी एका जोडीचे आव्हान असेल. याशिवाय क्रमवारीत सातव्या क्रमांकावरील फजार अल्फियान आणि मुहम्मद रियान आर्डियांटो जोडी त्यांच्याकडे आहे.
’ वेळ : सकाळी ११.३० वा.
’ थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स१८-१ (एचडी वाहिनीसह)
दुखापतीनंतरही प्रणॉयचा लक्षवेधी खेळ
कोर्टवर घसरल्याने पायाला दुखापत झाल्यामुळे प्रणॉयने डेन्मार्कच्या रॅसमूस गेमकेविरुद्धच्या उपांत्य लढतीत वैद्यकीय विश्रांती घेतली, परंतु या निर्णायक सामन्यात माघार घ्यायची नाही. सर्वोत्तम प्रयत्न करायचा, हा निर्धार केला. मग पहिला गेम गमावल्यावरही दुसऱ्या आणि तिसऱ्या गेममध्ये दुखापत विसरून खेळ उंचावला, असे प्रणॉयने सांगितले. प्रणॉयने शुक्रवारी गेमकेला १३-२१, २१-९, २१-१२ असे हरवत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. हा कारकीर्दीतील सर्वोत्तम विजय असल्याने प्रणॉयने नमूद केले.