थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धा : भारताचा ऐतिहासिक सुवर्णाध्याय!

थॉमस चषक विजेत्या भारतीय पुरुष संघाला क्रीडा मंत्रालयाकडून एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले.

अंतिम सामन्यात इंडोनेशियाचा ३-० असा धुव्वा; लक्ष्य, श्रीकांत, सात्त्विक-चिरागचे विजय

बँकॉक :भारतीय बॅडिमटन आणि एकंदर क्रीडा क्षेत्र प्रगतिपथावर असल्याचा रविवारी पुन्हा एकदा प्रत्यय आला. भारतीय पुरुष बॅडिमटन संघाने १४ वेळा विजेत्या इंडोनेशियाचा ३-० असा धुव्वा उडवण्याची अनपेक्षित कामगिरी करत थॉमस चषक स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली. या स्पर्धेच्या ७३ वर्षांच्या इतिहासातील भारताचे पहिलेच जेतेपद ठरले.

भारतीय संघाने यापूर्वी थॉमस चषकाची अंतिम फेरी गाठली नव्हती. त्यामुळे या लढतीत थॉमस चषकातील सर्वात यशस्वी संघ इंडोनेशियाचे पारडे जड मानले जात होते. त्यातच पुरुष एकेरीच्या पहिल्या सामन्यात लक्ष्य सेन, तर पुरुष दुहेरीच्या सामन्यात चिराग शेट्टी आणि सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी जोडीला पहिला गेम गमवावा लागला होता. मात्र, भारतीय खेळाडूंनी आपल्या हार न मानण्याच्या वृत्तीचे दर्शन देत दमदार पुनरागमन केले आणि आपापले सामने जिंकले. त्यांची ही मेहनत मग अनुभवी किदम्बी श्रीकांतने वाया जाऊ दिली नाही. त्यानेही पुरुष एकेरीतील आपल्या सामन्यात बाजी मारत भारताच्या ऐतिहासिक जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमधील कांस्यपदक विजेत्या लक्ष्यने अंतिम सामन्यात भारताला विजयी प्रारंभ करून दिला. त्याला पिछाडीनंतरही जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या अँथनी सिनिसुका गिंटिंगला ८-२१, २१-१७, २१-१६ असे पराभूत करण्यात यश आले. या सामन्याचा पहिला गेम लक्ष्यने तब्बल १३ गुणांच्या फरकाने गमावला. मात्र, त्याने मानसिक कणखरता दाखवत दुसऱ्या गेममध्ये आपल्या खेळात सुधारणा केली. या गेमच्या मध्यंतराला लक्ष्यकडे ११-७ अशी आघाडी होती. त्यानंतर त्याने अधिक आक्रमकता दाखवत गिंटिंगवर दडपण टाकले. त्यामुळे गिंटिंगने चुका करण्यास सुरुवात केली. अखेरीस लक्ष्यने दुसरा गेम २१-१७ असा जिंकत सामन्यात बरोबरी साधली. तिसऱ्या आणि निर्णायक गेमच्या सुरुवातीला गिंटिंगने ५-१ अशी मोठी आघाडी घेतली. तसेच मध्यंतराला तो ११-७ अशा गुणफरकाने पुढे होता. मात्र, लक्ष्यने पुन्हा जिद्द दाखवत आधी गेममध्ये १२-१२ अशी बरोबरी साधली आणि मग आक्रमक खेळ सुरू ठेवत हा गेम २१-१६ असा खिशात टाकला.

दुहेरीच्या सामन्यात भारताची आघाडीची जोडी सात्त्विक-चिरागने मोहम्मद एहसान आणि केव्हिन संजाया सुकामुल्जो जोडीवर १८-२१, २३-२१, २१-१९ अशी मात केली. या सामन्यातील तीनही गेम चुरशीचे झाले. पहिला गेम गमावल्यानंतर भारतीय जोडीने दुसऱ्या गेममध्ये विजयी पुनरागमन केले. त्यानंतर तिसऱ्या गेममध्ये सात्त्विक-चिरागने आपल्या उंचीचा अधिक वापर केला. त्यांनी या गेमच्या मध्यंतराला ११-९ अशी आघाडी मिळवली; परंतु इंडोनेशियन जोडीने पुन्हा खेळ उंचावत १६-१६ अशी बरोबरी साधली. त्यातच सव्‍‌र्हिस करण्यापूर्वी खूप वेळ घेतल्याने सात्त्विकला पिवळे कार्डही दाखवण्यात आले. मात्र, याचा भारतीय जोडीवर विपरीत परिणाम झाला नाही. त्यांनी हा गेम २१-१९ अशा फरकाने जिंकत भारताला एकूण लढतीत २-० अशी आघाडी मिळवून दिली.

त्यानंतर एकेरीच्या दुसऱ्या सामन्यात जागतिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या श्रीकांतने आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या जोनाटन ख्रिस्टीला ४८ मिनिटांत २१-१५, २३-२१ असे नमवले. या सामन्याचा पहिला गेम श्रीकांतने सहा गुणांच्या फरकाने जिंकला. दुसरा गेम अधिक अटीतटीचा झाला. या गेममध्ये २१-२१ अशी बरोबरी असताना श्रीकांतने सलग दोन गुण जिंकत भारताचे सुवर्णपदक सुनिश्चित केले.

क्रीडा मंत्रालयाकडून एक कोटीचे बक्षीस

नवी दिल्ली : थॉमस चषक विजेत्या भारतीय पुरुष संघाला क्रीडा मंत्रालयाकडून एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. ‘‘भारताने बाद फेरीत मलेशिया, डेन्मार्क आणि इंडोनेशियावर सलग विजय मिळवण्याची कामगिरी केल्याने आम्हाला नियमांमध्ये बदल करणे भाग पडले आहे. विजेत्या भारतीय संघाला एक कोटीचे रोख बक्षीस जाहीर करताना मला खूप अभिमान वाटतो आहे,’’ असे केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर म्हणाले. तसेच त्यांनी खेळाडू, प्रशिक्षक आणि अन्य साहाय्यकांचे कौतुक करताना त्यांचे अभिनंदनही केले.

विजेत्या भारतीय संघाचे सदस्य

किदम्बी श्रीकांत : यंदाच्या थॉमस चषक स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघाचा श्रीकांत हा सर्वात अनुभवी खेळाडू होता. श्रीकांतने गेल्या वर्षी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते. २०१८च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्याने पुरुष एकेरीत रौप्य आणि मिश्र सांघिक गटात सुवर्णपदक पटकावण्याची कामगिरी केली. कनिष्ठ स्तरावरही त्याने भारतासाठी पदकांची कमाई केली आहे. यासह त्याने जागतिक सुपर सीरिज आणि सुपर सीरिज स्पर्धाचे जेतेपद मिळवले आहे.

लक्ष्य सेन : २० वर्षीय लक्ष्य सेनने आपल्या युवा कारकीर्दीतच चमकदार कामगिरी करत सर्वाचे लक्ष वेधले आहे. कनिष्ठ स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतर वरिष्ठ गटात छाप पाडण्यासाठी त्याला वेळ लागला नाही. त्याने गेल्या वर्षी पदार्पणातच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक मिळवले. आशियाई सांघिक अजिंक्यपद स्पर्धेतही त्याने कांस्यपदक आपल्या नावे केले. त्यापूर्वी युवा ऑलिम्पिक (रौप्यपदक आणि सांघिक सुवर्ण) आणि जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेतही (कांस्यपदक) त्याने चमक दाखवली.

एचएस प्रणॉय : श्रीकांतनंतर सध्याच्या भारतीय संघातील अनुभवी खेळाडू म्हणून प्रणॉयकडे पाहिले जाते. त्याच्या या अनुभवाचा फायदा भारताला या स्पर्धेतही झाला. त्याने उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत निर्णायक विजय मिळवले. त्याने यापूर्वी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली आहे. त्याने २०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या मिश्र दुहेरीतही सुवर्ण कामगिरी केली. आशियाई सांघिक अजिंक्यपद स्पर्धेतही (कांस्यपदक) त्याने चमक दाखवली. 

सात्त्विक-चिराग : सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही भारताची पुरुष दुहेरीतील सर्वात आघाडीची जोडी मानली जाते. आंध्रचा सात्त्विक आणि मुंबईकर चिराग यांची जोडी भारताचे माजी प्रशिक्षक टॅन किम हर यांनी जमवली. त्यांनी एकत्रित खेळताना दोन वर्षांच्या कालावधीत हैदराबाद ओपन, सय्यद मोदी, थायलंड ओपन आणि फ्रेंच ओपन अशा चार मोठय़ा स्पर्धा जिंकल्या. याच दरम्यान २०१८ राष्ट्रकुल स्पर्धेतही या दोघांना कांस्यपदक जिंकण्यात यश आले. तसेच टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदार्पणात त्यांनी जागतिक क्रमवारीतील तिसऱ्या क्रमांकाच्या जोडीला पराभूत केले. आता त्यांना थॉमस चषकातही दमदार कामगिरी करण्यात यश आले.

विमल कुमार : भारताच्या थॉमस चषकातील ऐतिहासिक कामगिरीत प्रशिक्षक विमल कुमार यांचेही योगदान महत्त्वाचे होते. खेळाडू म्हणून १९८६च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई करणारे विमल हे निवृत्त झाल्यानंतर प्रशिक्षणाकडे वळले. त्यांनी अनेक वर्षे भारतीय बॅडिमटन संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावली. त्यानंतर २००६मध्ये गोपीचंद अकादमीतील युवा खेळाडूंना मार्गदर्शन करता यावे यासाठी त्यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. सध्या ते सायना नेहवाल आणि तिचा पती पारुपल्ली कश्यप यांना मार्गदर्शन करत आहेत, तसेच ते भारतीय संघातील खेळाडूंनाही प्रशिक्षण देत आहेत.

ऑलिम्पिक

* पीव्ही सिंधू (रौप्य-२०१६, कांस्य-२०२०)

* सायना नेहवाल (कांस्य-२०१२)

जागतिक अजिंक्यपद स्पर्धा

* प्रकाश पडुकोण (कांस्य-१९८३)

* ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा (कांस्य-२०११)

* पीव्ही सिंधू (सुवर्ण-२०१९, रौप्य-२०१७,२०१८, कांस्य-२०१३, २०१४)

* सायना नेहवाल (रौप्य-२०१५,

कांस्य-२०१७)

* बी.साईप्रणीत (कांस्य-२०१९)

* किदम्बी श्रीकांत (रौप्य-२०२१)

* लक्ष्य सेन (कांस्य-२०२१)

ऑल इंग्लंड बॅडिमटन स्पर्धा

* प्रकाश पडुकोण (सुवर्ण-१९८०,

रौप्य-१९८१)

* पुलेला गोपीचंद (सुवर्ण-२००१)

* सायना नेहवाल (रौप्य-२०१५) * लक्ष्य सेन (रौप्य-२०२२)

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Thomas cup india win historic gold medal after beating indonesia in final zws

Next Story
गोलंदाजांनी करुन दाखवलं, राजस्थानचा लखनऊवर २४ धावांनी विजय
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी