बँकॉक : भारतीय पुरुष संघाने सोमवारी कॅनडाला ५-० अशी धूळ चारताना थॉमस चषक बॅडिमटन स्पर्धेच्या साखळी फेरीत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. या कामगिरीसह त्यांना या स्पर्धेची बाद फेरी गाठण्यात यश आले. भारतीय संघाने आपल्या पहिल्या लढतीत जर्मनीला ५-० असे नमवले होते. त्यामुळे भारताचे ‘क’ गटात अव्वल दोन संघांतील स्थान निश्चित आहे.

कॅनडाविरुद्ध जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या किदम्बी श्रीकांतने पिछाडीवरून दमदार पुनरागमन करत पहिल्या एकेरीच्या लढतीत ब्रायन यांगला २०-२२, २१-११, २१-१५ असे पराभूत केले. त्यानंतर दुहेरीच्या लढतीत सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने जेसन अँथनी हो-शू आणि केव्हिन ली जोडीला २१-१२, २१-११ असे सहज नमवले. दुसऱ्या एकेरीच्या लढतीत एचएस प्रणॉयने बीआर संकीर्थवर २१-१५, २१-१२ अशी मात करत भारताला एकूण सामन्यात ३-० अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या दुहेरीच्या लढतीत कृष्णा प्रसाद गर्गा आणि विष्णुवर्धन गौड पंजाला जोडीने डोंग अ‍ॅडम आणि निल याकुरा जोडीला २१-१५, २१-११ असे पराभूत केले. अखेरच्या लढतीत लक्ष्य सेनच्या जागी संधी मिळालेल्या प्रियांशु राजावतने व्हिक्टर लालवर २१-१३, २०-२२, २१-१४ अशी सरशी साधत संघाला ५-० असा विजय मिळवून दिला. भारतीय संघ यंदा या स्पर्धेत आपले पहिले पदक मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांचा अखेरचा साखळी सामना बुधवारी चायनीझ तैपेइशी होणार आहे.