पीटीआय, बँकॉक : दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू आणि जागतिक कांस्य विजेता लक्ष्य सेन यांच्यावर रविवारपासून सुरू होणाऱ्या थॉमस आणि उबर चषक बॅडिमटन स्पर्धेत भारताच्या आव्हानाची धुरा असेल. गतवर्षी भारताच्या पुरुष आणि महिला संघाने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. यंदा भारताकडून पुरुष एकेरी संघात जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावर असलेला लक्ष्य सेन, ११व्या स्थानावरील किदम्बी श्रीकांत आणि एचएस प्रणॉय यांचा समावेश आहे. दुहेरीची भिस्त  सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीकडे असेल. एमआर अर्जुन आणि ध्रुव कपिला तसेच कृष्ण प्रसाद गर्गा आणि विष्णुवर्धन गौड पंजाला या दुहेरी जोडय़ांचाही संघात समावेश आहे. क-गटात समावेश असलेल्या भारताच्या मोहिमेला जर्मनीविरुध्द सलामीच्या लढतीने प्रारंभ होईल. या गटात चायनीज तैपेई आणि कॅनडा यांचाही समावेश आहे.

महिला एकेरीत सिंधूच्या खेळाकडे सर्वाचे लक्ष आहे. तनिषा क्रॅस्टो, श्रुती मिश्रा, सिमरन सिंघी, रितिका ठाकर आणि त्रिसा जॉली यांच्या खांद्यावर महिला दुहेरीची जबाबदारी असेल. या स्पर्धेत एकूण १६ संघांना चार गटांत विभागण्यात आले  असून, अव्वल दोन संघांना बाद फेरीत स्थान मिळेल. या स्पर्धेत इंडोनेशियाचा संघ आतापर्यंतचा सर्वात यशस्वी संघ आहे. ‘‘थॉमस कप जिंकण्याची भारतीय संघाला सर्वोत्तम संधी आहे. आम्हाला फक्त चांगला खेळ करावा लागेल. भारतीय खेळाडू जगातील सर्वोत्तम खेळाडूंना पराभूत करण्यास सक्षम आहेत,’’ असे भारताचे माजी प्रशिक्षक विमल कुमार यांनी सांगितले.