आयपीएल हंगामाच्या निमित्ताने षटकारांचा अक्षरक्ष: पाऊस पडताना दिसत आहे. मैदानाच्या कानाकोपऱ्यात षटकार बसताना दिसत आहेत. फलंदाजांसाठी आनंददायी असा हा फटका गोलंदाजांसाठी मात्र कर्दनकाळ झाला आहे.
टी२० हा अन्य प्रकारांच्या तुलनेत वेगवान प्रकार आहे. कमीत कमी चेंडूत जास्तीत जास्त धावा हे इथलं समीकरण आहे. त्यामुळे षटकारांची संख्या जास्त असणं साहजिक आहे. २००८ मध्ये झालेल्या आयपीएलच्या पहिल्यावहिल्या हंगामात ५९ सामन्यात ६२२ षटकार लगावण्यात आले होते. प्रति सामन्यामागे जवळपास १० षटकार असं सूत्र होतं. निवडणुकांमुळे दुसरा हंगाम दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आला. तिथल्या खेळपट्ट्या वेगळ्या आहेत. त्यामुळे षटकारांची संख्या ५०६ एवढीच झाली. पुढच्या हंगामात आयपीएलचं मायदेशी पुनरागमन झालं. षटकारांची संख्या थोडी वाढून ५८५ एवढी झाली. २०११ हंगामात षटकारांच्या संख्येने सहाशेचा टप्पा ओलांडला. त्यावर्षी ६३९ षटकार पाहायला मिळाले.
२०१२ मध्ये ७३१ षटकार नोंदले गेले.आधीच्या हंगामाच्या तुलनेत षटकारांमध्ये घाऊक वाढ झाली. २०१३ मध्ये मात्र आश्चर्यकारकरीत्या षटकारांची संख्या घटली. यावर्षी ६७२ षटकार लगावले गेले. २०१४ मध्ये संख्या पुन्हा वाढून ७१४ एवढी झाली. षटकार कमी होण्याचा ट्रेंड कायम राहिला आणि २०१५ मध्ये ६९२ षटकार लगावले गेले. २०१६ मध्ये संख्या आणखी कमी झाली आणि ६३८ षटकार चोपले गेले. २०१७ मध्ये षटकारांचा आलेख उंचावला आणि त्यांनी सातशेचा टप्पा ओलांडला. त्यावर्षी ७०५ षटकार झाले.
वर्षभरात फलंदाजांना षटकारांचं महत्त्व उमगलं आणि पहिल्यांदाच षटकारांनी आठशेची वेस ओलांडली. षटकारांची संख्या ८७२ एवढी भरली. वर्षभरात षटकारांचा ट्रेन्ड खाली उतरला आणि ७८४ षटकारच पाहायला मिळाले. कोरोना बाधित आयपीएल हंगामात षटकारांमध्ये घट झाली आणि आकडा ७३४वर स्थिरावला. युएईत झालेल्या आयपीएल हंगामात षटकारांची संख्या रोडावली आणि ६८७ षटकार पाहायला मिळाले.
खालावणाऱ्या आकडेवारीचं उट्टं फलंदाजांनी २०२२ हंगामात काढलं. यावर्षी पहिल्यांदा षटकारांनी हजाराची वेस ओलांडली. १०६२ षटकार पाहायला मिळाले. २०२३ मध्ये षटकारांचीच सद्दी राहिली आणि ११२४ षटकार चोपले गेले. २०२४ मध्ये षटकारांचा बोलबाला राहिला आणि १२६० एवढे षटकार झाले. २०२५ मध्ये म्हणजे गेल्या हंगामात षटकारांनी कहर केला आणि विक्रमी १२९४ षटकार लगावण्यात आले. प्रति सामना षटकारांची संख्या सरासरी १८ एवढी झाली आहे.
दोनशेची वेस सहज होतेय पार
२००८ ते २०२२ या प्रदीर्घ कालावधीत संघांनी दोनशेचा टप्पा ओलांडण्याचं प्रमाण जेमतेम ७ टक्के एवढंच होतं. २०२२ नंतर म्हणजे पुढच्या चार हंगामात हे प्रमाण ३० टक्क्यांवर जाऊन पोहोचलं आहे. २००८ मध्ये पहिल्यावहिल्या हंगामात १४५ ही सरासरी धावसंख्या होती. प्रत्येक सामन्यात सरासरी षटकारांची संख्या १० पर्यंत असे. आता दोनशेचा टप्पा सर्रास पार होताना दिसतो. २०२२ नंतर सरासरी धावसंख्या १७२ इतकी झाली आहे. यातली मेख अशी की फलंदाज जास्त वेळ फलंदाजी करत आहेत असं नाहीये तर ते वेगाने धावा करत आहेत. कमीत कमी चेंडूत जास्तीत जास्त धावा हे सूत्र झालं आहे.
पॉवरप्ले मध्ये धावांची आतषबाजी
आयपीएल सुरू झालं तेव्हा संघांची फटकेबाजी करण्याची पद्धत वेगळी होती. पॉवरप्लेमध्ये प्रति षटक सरासरी ७ ते ८ धावा होत. मधल्या षटकांमध्ये ७ ते १४ टप्प्यात, हे प्रमाण सरासरी ८ एवढं होतं. हाणामारीच्या म्हणजेच १५ ते २० या कालावधीत सरासरी १० धावा होत असत. डावाच्या उत्तरार्धात अधिक धावा होत असत. कालौघात ही पद्धती पू्र्णत: बदलली आहे. पॉवरप्लेच्या सहा षटकांमध्ये तुफान आक्रमण करण्याचा ट्रेंड रूढ झाला आहे. ३० गज वर्तुळाच्या बाहेर दोनच क्षेत्ररक्षक असताना जास्तीत जास्त धावा करण्याचा संघांचा प्रयत्न असतो. धावांचा पाठलाग करतानाही पॉवरप्लेमध्ये जास्तीत जास्त धावा करत विजयाचा पाया रचण्याचा संघांचा प्रयत्न असतो. पॉवररप्लेची षटकं गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरत आहेत. मधल्या षटकांमध्ये आताही धावा करण्याचं प्रमाण खूप वाढलेलं नाही. हाणामारीच्या षटकांमध्ये सरासरी ११ धावा कुटल्या जात आहेत.
धावांचं आणि षटकारांचं प्रमाण का वाढतंय?
खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही पोषक असायला हवी मात्र अलीकडे खेळपट्टी पाटा स्वरुपाची असते. पहिल्या चेंडूपासून फलंदाज गोलंदाजाची कत्तल करतात. फटकेबाजी करता येणं हे फलंदाजांचं कौशल्य निर्विवाद आहेच पण खेळपट्टीकडून जराही सहाय्य मिळत नसल्याने गोलंदाजांना त्यांचं कर्तृ्त्व दाखवण्याची संधीच मिळत नाही.
अनेक मैदानांचा आकार छोटा आहे. ताकदवान फलंदाजाने मारलेला सहज फटका षटकार होऊन जातो. मुंबईतील वानखेडे स्टेडियम असो किंवा बंगळुरूचं चिन्नास्वामी स्टेडियम- षटकारांची लयलूट पाहायला मिळते. या बरोबरीने बाऊंड्री आतही आणली जाते जेणेकरून चौकार-षटकारांची बरसात व्हावी.
बॅटचा आकार वाढला आहे. यामुळे पल्लेदार फटके लगावणं सोपं झालं आहे. पॉवर हिटिंग म्हणजे फक्त फटकेबाजीवर लक्ष केंद्रित करणारे खेळाडू वाढले आहेत. आयपीएलमध्ये नव्याने येणारे अनेक खेळाडू हे देशाच्या कानाकोपऱ्यात होणाऱ्या टेनिस क्रिकेटचं प्रॉडक्ट आहेत. काही दिवसांपूर्वीच लखनौकडून खेळणाऱ्या मुकुल चौधरीने अफलातून फटकेबाजीने चाहत्यांना प्रभावित केलं होतं. मुकुलच्या फटकेबाजीच्या बळावर लखनौने शानदार विजय साकारला. ‘बचाव हा माझा प्रांत नाही. मी मुख्यत:फटकेबाजीवर लक्ष केंद्रित करतो. षटकार मारायला मला आवडतात. त्याचा मी अथक सराव करतो. नैसर्गिक उंची आणि ताकदीचा फायदा मिळतो’, असं मुकुलने सामन्यानंतर बोलताना सांगितलं.
१५वर्षीय वैभव सूर्यवंशी भल्याभल्या गोलंदाजांना फोडून काढत आहे. जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह अशा मातब्बर गोलंदाजांविरुद्धही वैभवाची बॅट तळपते आहे. गोलंदाजांचा सन्मान किंवा मोठ्या गोलंदाजांना खेळून काढणं या संकल्पना कालबाह्य झाल्या आहेत. फटका खेळणं शक्य असेल तर चोप हेच सूत्र प्रमाण झालं आहे.
