वास्तव्यास असलेल्या हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा इशारा; ‘ईसीबी’ची माहिती

न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाच्या हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी मिळाली असल्याची माहिती इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) मंगळवारी दिली. मात्र ही धमकी कोणाकडून मिळालेली आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

न्यूझीलंडचा महिला संघ सध्या इंग्लंडमध्ये एकदिवसीय मालिका खेळत आहे. काही दिवसांपूर्वीच न्यूझीलंडच्या पुरुष संघाने पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली. पहिला एकदिवसीय सामना सुरू होण्यासाठी काही तास शिल्लक असतानाच न्यूझीलंडने सुरक्षेच्या कारणास्तव मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सोमवारी इंग्लंडच्या संघानेसुद्धा पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास नकार दिला. त्यामुळे न्यूझीलंडच्या महिला संघाला मिळालेल्या धमकीचे या घटनांशी संबंध असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘‘न्यूझीलंडच्या महिला खेळाडूंच्या हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यात येणार असल्याची धमकी आम्हाला ई-मेलद्वारे मिळाली. त्यामुळे न्यूझीलंडच्या खेळाडूंची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मात्र इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना नियोजनाप्रमाणेच होईल,’’ असे ‘ईसीबी’ने पत्रकात म्हटले. त्याशिवाय न्यूझीलंड क्रिकेट मंडळानेसुद्धा न्यूझीलंडचे कोणतेही सराव सत्र अथवा सामना रद्द करण्यात आला नसून सर्व खेळाडू सुरक्षित असल्याचे ‘ट्वीट’ केले.

त्याशिवाय न्यूझीलंड क्रिकेट मंडळातील एका पदाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार महिला संघ मायदेशी परतताना त्यांच्या विमानात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकीही देण्यात आली आहे. यासंबंधी न्यूझीलंडने इंग्लंडला कल्पना दिली असून इंग्लंडने खेळाडूंच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी घेण्याचे वचन दिले आहे.

पाकिस्तानकडून आरोपाचे खंडन

इस्लामाबाद : न्यूझीलंडच्या महिला संघाला मिळालेल्या धमकीशी पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा (पीसीबी) काहीही संबंध नसल्याचे वृत्त तेथील एका संकेतस्थळाने प्रसिद्ध केले आहे. त्याशिवाय ‘पीसीबी’ने न्यूझीलंड क्रिकेट मंडळाच्या दुटप्पीपणावर ताशेरे ओढले आहेत. एकीकडे न्यूझीलंडचा संघ सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानातून माघारी परतला असताना, महिला संघ मात्र इंग्लंडमध्ये बॉम्बस्फोटची धमकी मिळूनही एकदिवसीय सामना खेळत आहे, अशी माहिती या वृत्तात देण्यात आली आहे.