IND vs AUS T20 : येत्या २० सप्टेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन टी-२० सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघांनी अद्याप आपले संघ जाहीर केलेले नाही. ऑस्ट्रेलियासारखा बलाढ्य संघ आणि आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धा लक्षात घेता, त्यादृष्टीने भारतीय संघाची निवड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय संघात महत्त्वाच्या खेळाडूंसह आणखी नव्या चेहऱ्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – उर्वशी रौतेलाचं पाकिस्तानी खेळाडूसोबत जोडलं जातंय नाव; चर्चेला उधाण आल्यानंतर दिलं स्पष्टीकरण; म्हणाली “माझ्या…”

हे खेळाडू करू शकतात टी-२० पदार्पण

शुभमन गिल –ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० मालिकेत शुभमन गिल आपले टी-२० पदार्पण करण्याची शक्यता आहे. त्याने या पूर्वी एकदिवसीय संघामध्ये पदार्पण केले आहे. अलीकडेच झालेल्या वेस्ट-इंडिज आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याची निवड करण्यात आली होती. यावेळी त्याने काही चांगल्या खेळीही केल्या आहेत. आतापर्यंत त्याने ९ एकदिवसीय सामने खेळले असून त्याने १ शतक आणि ३ अर्धशतकांसह ७१.२९ च्या सरासरीने ४९९ धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात केलेल्या या कामगिरीनंतर त्याला आता टी-२० संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

राहुल त्रिपाठी – आयपीएल २०२२ मध्ये केलेल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर राहुल त्रिपाठीने भारतीय टी-२० संघात स्थान मिळवले होते. अलीकडच्या काळात झालेल्या काही टी-२० मालिकेतही त्याचा सहभाग होता. मात्र, त्याला प्लेईंग ११ मध्ये स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे त्याला आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – Video: तेंडुलकरची बॅट पुन्हा तळपली; दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध सचिनचा ‘हा’ एक शॉट खाऊन गेला भाव

प्रसिद्ध कृष्णा – प्रसिद्ध कृष्णाने गेल्या वर्षी भारतीय एकदिवसीय संघात पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत १४ एकदिवसीय सामने खेळले असून २३.९२च्या सरासरीने २५ बळी घेतले आहेत. दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मालिकेत जसप्रित बुमराह आणि हर्षल पटेल हे दोघेही खेळण्याची शक्यता कमी आहे. त्याच्या अनुपस्थितीत प्रसिद्ध कृष्णाला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यालाही टी-२० संघात पदार्णप करण्याची संधी आहे.