वनडे वर्ल्डकप वर्षभरावर आलेला असताना वनडे मालिकांची संख्या वाढली आहे. रविवारी झालेल्या तीन वनडेत मिळून ६ शतकं पाहायला मिळाली. चाहत्यांना शतकी षटकाराच्या निमित्ताने अनोखी पर्वणी मिळाली. जोहान्सबर्ग, तिरुवनंतपुरम आणि लंडन अशा तीन ठिकाणी हे सामने झाले. खेळपट्ट्या आणि वातावरण विभिन्न होतं. तरीही प्रत्येक सामन्यात शतक पाहायला मिळालं.
टॉम बँटनचं पहिलंवहिलं शतक
जेकब बेथेल दुखापतग्रस्त झाल्याने संधी मिळालेल्या टॉम बॅंटनने संधीचं सोनं केलं. कारकिर्दीत पहिल्यांदाच इंग्लंडसाठी सलामीला उतरलेल्या बॅंटनने आक्रमक शतकी खेळी केली. टी२० विशेषज्ञ असा शिक्का बसलेल्या टॉमने १६ षटकार आणि ५ षटकारांसह १०५ चेंडूत १२६ धावांची खेळी केली. हॅरी ब्रूक आणि जॉर्डन कॉक्स यांनी अर्धशतकी खेळी करत त्याला चांगली साथ दिली.
टॉमच्या पहिल्यावहिल्या शतकाच्या बळावर इंग्लंडने ३५५ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरादाखल खेळताना श्रीलंकेचा डाव १३२ धावांतच आटोपला. इंग्लंडने २२३ धावांच्या प्रचंड फरकाने सामना आणि मालिकाही जिंकली. टॉमला सामनावीर तर विल जॅक्सला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
कर्णधार तेंबाने घालून दिला आदर्श
वनडे सामन्यात तेंबाचं स्थान काय असा प्रश्न विचारणाऱ्या चाहत्यांना त्याने शतकी खेळीसह चोख प्रत्युत्तर दिलं. तेंबाच्या नेतृत्वातच आफ्रिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल जिंकली होती. पुढच्या वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्डकपसाठीही तेंबाकडेच नेतृत्वाची धुरा असणार आहे. कसोटी विशेषज्ञ असा शिक्का बसलेल्या तेंबाने १० चौकार आणि २ षटकारांसह १०३ धावांची सुरेख खेळी साकारली.
एडन मारक्रम आणि क्विंटन डी कॉक झटपट तंबूत परतल्याने तेंबावर डाव सावरण्याची जबाबदारी होती. तेंबाने आधी मॅथ्यू ब्रीझ्ट आणि नंतर डेव्हिड मिलरच्या साथीने मोठ्या भागीदारी रचल्या. तेंबा आणि मिलरच्या शतकी खेळीच्या बळावर आफ्रिकेने ३६५ धावांचा डोंगर उभारला. ऑस्ट्रेलियाने ३३३ धावांची मजल मारत चांगली टक्कर दिली.
तळपत्या उन्हात शतकी नजराणा
वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड आर्थिक संकटात आहे. त्यामुळे वेस्ट इंडिज संघाचा भारत दौरा होणार का याविषयी साशंकता होती. रविवारी वेस्ट इंडिजचा संघ खेळायला उतरला. तिरुवनंतपुरमच्या तळपत्या उन्हात आणि प्रचंड आर्द्रतेत जस्टीन ग्रीव्ह्जने देखणं शतक साकारलं. क्रॅम्पचा त्रास होत असूनही जस्टीनने भारतीय गोलंदाजांना चोपून काढलं. जस्टीनने १२ चौकारांसह १०१ धावा केल्या. चांगल्या सलामीनंतर वेस्ट इंडिजची घसरण झाली. जस्टीनचं वनडेतलं हे पहिलंच शतक आहे.
चेसमास्टर विराटचा वस्तुपाठ
वनडे क्रिकेटमध्ये चेस अर्थात धावांचा पाठलाग कसा करावा याचा वस्तुपाठ म्हणजे विराटच्या खेळी असतात. चाळिशीच्या उंबरठ्यावर आणि बाकी फॉरमॅट न खेळणाऱ्या विराटने अजूनही भरपूर क्रिकेट शिल्लक असल्याचं दाखवून दिलं. ५० षटकं तळपत्या उन्हात क्षेत्ररक्षण झाल्यानंतर विराट फलंदाजीला आला. एकेरी, दुहेरी धावा आणि चौकार, षटकार यांचा सुरेख मिलाफ साधत विराटने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना निरुत्तर केलं. विराटने शुबमन गिलच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी १५२ धावांची भागीदारी केली.
कोहलीने १० चौकार आणि तब्बल ९ षटकारांसह नाबाद १३९ धावा केल्या. विराटचं वनडेतलं ५५वं तर कारकिर्दीतलं ८६वं शतक होतं. शतकी खेळीदरम्यान विराटने १५००० धावांचा टप्पाही ओलांडला. सर्वाधिक शतकं आणि सर्वाधिक धावांचा सचिन तेंडुलकरचा विक्रम कोहलीला खुणावतो आहे.
गिलचा शतकी दणका
वेस्ट इंडिजने दिलेल्या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा कर्णधार शुबमन गिलने खणखणीत शतक झळकावलं. अनुभवी साथीदार रोहित शर्मा झटपट बाद झाल्यानंतर शुबमनने विराटच्या साथीने संघाच्या विजयाचा पाया रचला.
गिलने १३ चौकार आणि एका षटकारासह ११० धावांची खेळी साकारली. नाबाद राहून संघाला जिंकून द्यायला आवडलं असतं असं गिलने सामन्यानंतर बोलताना सांगितलं. वर्ल्डकप वर्षभरावर असताना गिलने शतकी खेळीसह या फॉरमॅटमध्येही सज्ज असल्याचं दाखवून दिलं.
कॉन्ट्रॅक्ट यादीतून केलं बाहेर, मिलरने दिलं शतकी प्रत्युत्तर
वर्ल्डकप वर्षभरावर आलेला असताना दक्षिण आफ्रिका बोर्डाने अनुभवी फिनिशर डेव्हिड मिलरला वार्षिक करारबद्ध खेळाडूंच्या यादीतून वगळलं. जरी मी जगभरात टी२० लीग खेळत असलो तरी आफ्रिकेसाठी खेळणं हे माझं सर्वोच्च प्राधान्य असेल. तो अतिशय अभिमानाचा, आनंदाचा आणि समाधानचा क्षण असतो असं मिलरने सांगितलं. नुसतं बोलून थांबला नाही तर जोहान्सबर्ग वनडेत मिलरने खणखणीत शतकी खेळी साकारत निवडसमिती आणि बोर्डाला प्रत्युत्तर दिलं.
जोहान्सबर्गच्या वाँडरर्स मैदानावर मिलरने ९३ चेंडूत १२ चौकार आणि ९ षटकारांसह १४२ धावांची तडाखेबंद खेळी केली. मिलरने कर्णधार तेंबा बावूमाच्या साथीने चौथ्या विकेटसाठी १३२ चेंडूत १५६ धावांची खेळी केली. तेंबाच्या शतकानंतर मिलरने सूत्रं हाती घेत जोरदार फटकेबाजी केली. मिलरचं वनडे कारकिर्दीतलं हे आठवं शतक आहे.
आफ्रिकेने एकदाही वनडे वर्ल्डकप जिंकलेला नाही. २०२७ वर्ल्डकप आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया इथे होणार आहे. आफ्रिकेचा संघ सहयजमान आहे. १५ वर्षांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असलेला मिलर दक्षिण आफ्रिका संघासाठी निर्णायक ठरू शकतो. घरच्या मैदानावर आफ्रिकेला जिंकून देण्यासाठी मिलर आतूर आहे. मात्र तरीही बोर्डाने अनाकलनीय निर्णय घेत मिलरला संघाबाहेर केलं. फिनिशरच्या जागेसाठी अनेक युवा खेळाडू शर्यतीत असल्याने मिलरला डच्चू देण्यात आला. मात्र या निर्णयानंतरही मिलरने आफ्रिकेकडून खेळण्यासाठी कटिबद्ध असल्याचं दाखवून दिलं आहे. ३७वर्षीय मिलरसाठी पुढच्या वर्षी होणारा वर्ल्डकप शेवटचा असू शकतो.
मिलर २०१५, २०१९ आणि २०२३ वनडे वर्ल्डकप स्पर्धेत आफ्रिकेच्या संघाचा अविभाज्य भाग होता. वर्ल्डकप स्पर्धेत २४ लढतीत त्याच्या नावावर ८१६ धावा आहेत. यामध्ये २ शतकं आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. घरच्या मैदानावर मिलरची कामगिरी आणखीनच बहरते.
