प्रो कबड्डी लीगच्या दुसऱ्या हंगामात अनेक दिग्गज संघनायकांकडून मोठय़ा अपेक्षा केल्या जात होत्या. मात्र प्रो कबड्डी मध्यावर आली असताना कबड्डीच्या क्षितिजावरील हे ‘तारे जमीं पर’ असल्याचे प्रत्ययास आल्यामुळे या अपयशी कर्णधारांना बदलण्याचा गंभीर निर्णय काही संघांनी घेतला आहे. संघनायक बदलल्याने तरी नशीब बदलेल, या आशेने पाटणा पायरेट्सने राकेश कुमार, तेलुगू टायटन्सने राहुल चौधरी आणि जयपूर पिंक पँथर्सने नवनीत गौतम यांचे कर्णधारपद काढून घेतले आहे.
भारताचा कर्णधार राकेश कुमारला पाटणा पायरेट्स संघाने गतवर्षी प्रो कबड्डीच्या पटावरील सर्वात जास्त म्हणजे १२ लाख ८० हजारांची बोली लावत संघात स्थान दिले होते. मात्र यंदाच्या हंगामात यू मुंबाविरुद्धच्या सलामीच्या लढतीत त्याला एकही गुण मिळवता आला नव्हता. मोठय़ा अपेक्षा असलेल्या राकेशच्या कामगिरीत त्यानंतरसुद्धा सुधारणा झाली नाही. पाटण्याला घरच्या मैदानावरील त्याच्या पहिल्याच सामन्यातील कामगिरीची दखल घेत संघ व्यवस्थापनाने संदीप नरवालकडे नेतृत्वाची धुरा सोपवली.
राहुल चौधरीने यंदाच्या हंगामातील सुरुवातीच्या सामन्यांमध्ये आपल्या दमदार चढायांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले. पण नंतर त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे बहरली नाही. त्यामुळे हैदराबादला येताच तेलुगू टायटन्सच्या संघ व्यवस्थापनाने इराणच्या मेराज शेखला कर्णधार बनवले. कर्णधारपदामुळे राहुलच्या कामगिरीवर परिणाम झाला, म्हणून आम्ही कर्णधारपदाची जबाबदारी मेराजकडे देत असल्याचे कारण तेलुगू टायटन्सचे प्रशिक्षक जे. उदय कुमार यांनी सांगितले. प्रो कबड्डीच्या पहिल्या हंगामात नवनीत गौतमच्या नेतृत्वाखाली जयपूर पिंक पँथर्सने विजेतेपदाला गवसणी घातली होती. परंतु दुसऱ्या हंगामात त्याच्या क्षेत्ररक्षणातील उणिवा समोर आल्यानंतर जयपूर संघाने कर्णधारपद जसवीर सिंगकडे सोपवले आहे.
यू मुंबाचा कर्णधार अनुप कुमारकडून आपल्या दर्जाला साजेसा खेळ होत नसला तरी संघाने आतापर्यंत अपराजित राहण्याची किमया साधली आहे. गुणतालिकेत तळाच्या स्थानावर असलेल्या पुणेरी पलटणचा कर्णधार वझीर सिंग मात्र नेटाने खेळत आहे. नेतृत्व बदलले की संघाची रणनीतीसुद्धा बदलते. त्यामुळे संघ व्यवस्थापनांच्या या धोरणाचे कोणते परिणाम दिसून येतात, ते पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.