मुंबई : स्पेनने अंतिम फेरीत गतविजेत्या अर्जेंटिनाला हरवून विश्वचषक २०२६ स्पर्धेचे अजिंक्यपद दिमाखात पटकावले. अशा रीतीने गेल्या स्पर्धेतील विजेते आणि उपविजेते (फ्रान्स) यांना पाठोपाठच्या फेऱ्यांमध्ये हरवण्याची करामत स्पेनने करून दाखवली. त्यांच्या कथित टिकी-टाका शैलीचा हा सर्वोत्तम आविष्कार असल्याचे मानले जाते. विशेष म्हणजे, कोणत्याच संघाला या पद्धतीवर तोडगा शोधता आलेला नाही.
हा खेळ आकड्यांचा
आजवर ब्राझील (५), इटली (४), जर्मनी (४), अर्जेंटिना (३), फ्रान्स (२), स्पेन (२), इंग्लंड (१) अशा आठच देशांना विश्वचषक जिंकता आला. परंतु या महारथी संघांमध्ये स्पेनची कामगिरी नवीन शतकात सर्वाधिक उजवी झाली असेच म्हणावे लागेल. जगज्जेत्यांचा ‘क्लब’मध्ये स्पेन सर्वांत उशिराने म्हणजे २०१०मध्ये दाखल झाला. नवीन शतकात ब्राझील (२००२), इटली (२००६), जर्मनी (२०१४), फ्रान्स (२०१८) आणि अर्जेंटिना (२०२२) या प्रस्थापित सत्तांनी एकेकदा जगज्जेतेपद पटकावले. स्पेनने यांच्या तुलनेत २०१० आणि २०२६ अशा दोन विश्वचषकांवर नाव कोरले. या जोडीला २००८, २०१२ आणि २०२४ युरो अजिंक्यपदांचा विचार केल्यास स्पेनची कामगिरी अधिकच झळाळते. युरो आणि पाठोपाठ विश्वचषक जिंकण्याची किमया स्पेनने दोनदा (२००८, २०१०; २०२४, २०२६) साधली. जर्मनीने प्रथम (१९७२, १९७४) अशी कामगिरी केली होती. तर विश्वचषकानंतर युरो जिंकण्याची करामतही (२०१०, २०१२) स्पेनच्या नावावर आहे. त्यांच्याव्यतिरिक्त केवळ फ्रान्सलाच (१९९८, २०००) हे जमले. गेल्या शतकात स्पेनच्या नावावर केवळ १९६४मधील युरो अजिंक्यपद होते. फुटबॉलमधील ‘पेरेनियल अंडरअचीव्हर्स’ या शब्दांत स्पेनची हेटाळणी केली जायची. त्यांच्याकडे फुटबॉलची संस्कृती आणि सुविधा होत्या. पण रेआल माद्रिद आणि बार्सिलोनासारखे क्लब असूनही आंतरराष्ट्रीय स्तरावर जर्मनी, इटली किंवा नंतर फ्रान्स या युरोपिय देशांप्रमाणे फारशी अजिंक्यपदे स्पेनच्या वाट्याला कधी येऊ शकली नाहीत.
टिकी-टाकाच्या युगात
नवीन शतकाच्या सुरुवातीसही स्पेनचा संघ २००२ विश्वचषक स्पर्धेत उपान्त्यपूर्व फेरीत सहयजमान दक्षिण कोरियाशी हरला होता. त्या सामन्यात रेफरींच्या चुकांचा फटका स्पेनला बसला, इतक्या महत्त्वाच्या सामन्यात एखाद्या आशियाई संघाने बड्या युरोपिय संघाला हरवण्याची ती पहिलीच वेळ होती. मग २००६मध्ये स्पेनचा संघ बऱ्यापैकी चांगला खेळत होता, पण उपान्त्यपूर्व फेरीत एक गोलने आघाडी घेऊनही झिनेदिन झिदानच्या फ्रान्सने त्यांना ३-१ असे हरवले. पण या काळात स्पेनची स्वतःची अशी शैली विकसित होऊ लागली होती. त्या संघात लिओनेल मेसी किंवा ख्रिस्तियानो रोनाल्डो किंवा डेव्हिड बेकहॅमसारखा वलयांकित खेळाडू नव्हता. मात्र शावी हर्नांडेझ, आंद्रेस इनिएस्टा, सर्गियो बुस्केट्ससारखे मिडफिल्डर उत्कृष्ट खेळ करू लागले होते. हे तिघेही बार्सिलोनाकडून खेळायचे. या क्लबने पेप गार्डियोलासारख्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली छोट्या-छोट्या पासेसची टिकी-टाका शैली विकसित केली. या शैलीचे टिकी-टाका असे नामकरण एका स्पॅनिश समालोचकाने केले होते. स्पेनच्या विश्वविजयी २०१०मधील संघामागे ती प्रेरणा होती. इतर संघांनी या घडामोडीची दखल घेतली नाही. बहुतेक संघ एक तर वैयक्तिक कौशल्यावर, सांघिक आक्रमण किंवा सांघिक बचावावर भर द्यायचे. त्याऐवजी मधल्या फळीत ठाण मांडून, चेंडूचा ताबा घेऊन प्रतिस्पर्धी संघांना सतावणे, त्यांना चुका करण्यास भाग पाडणे ही टिकी-टाकामागील प्रमुख प्रेरणा होती. हर्नांडेझ, इनिएस्टा, बुस्केट्स यांच्या मागे कार्लेझ पुयॉल, सर्गियो रामोस आणि झाबी अलोन्सो ही मजबूत बचावफळी होती. त्यामुळे टिकी-टाका प्रचंड यशस्वी ठरले. स्पेनने त्या काळात २०१०मधील जगज्जेतेपद आणि २००८, २०१२ युरो अजिंक्यपदे पटकावली.
टोटल फुटबॉल काय होते?
नेदरलँड्स संघाने विश्वचष १९७४मध्ये ‘टोटल फुटबॉल’ ही क्रांतिकारी संकल्पना जगासमोर पेश केली. या अत्यंत गुंतागुंतीच्या आणि अवघड संकल्पनेचे जनक होते तत्कालीन डच फुटबॉल प्रशिक्षक रिनस मिकेल्स. पण ती प्रत्यक्ष मैदानावर साकारण्याचे श्रेय डच संघाचे कर्णधार आणि महान फुटबॉलपटू योहान क्रायुफ यांचे. कौशल्य, वेग आणि शारीरिक जडणघडणीनुसार मैदानांवर फुटबॉलपटूंच्या आभासी फळ्या किंवा स्तर बनवले जातात, ज्या ठरतात संरचना किंवा फॉर्मेशन. प्रत्येक फुटबॉलपटूची भूमिका आणि उद्दिष्ट निश्चित असते. यात लवचीकता असते, तरी रचनेत बदल करण्याचे स्वातंत्र्य फारसे नसते. ‘टोटल फुटबॉल’मध्ये या तत्त्वाला पूर्णतः छेद देणारी मांडणी असते. प्रत्येक खेळाडू कोणत्याही स्थानावर खेळू शकतो, नव्हे तसे खेळले पाहिजे. आणि यासाठी त्याने कौशल्यसुसज्ज असलेच पाहिजे. पुन्हा हा निव्वळ कौशल्याचा मुद्दा नाही. अवकाशभानही असणे तितकेच निकडीचे. क्रायुफ यांनी म्हटले होते, ‘हजार वेळा चेंडूवर कौशल्यच दाखवायचेय तर सर्कशीत जावे. ते फुटबॉल नव्हे. योग्य खेळाडूकडे योग्य वेळी योग्य त्या ठिकाणी योग्य त्या पायाशी पास पुरवणे याला फुटबॉल म्हणतात’! मिकेल्स-क्रायुफ संरचनेत तरल भूमितीय जाणिवेला महत्त्व होते. स्थळ-काळ-वेगाचा तो मनोहारी आविष्कार होता. मिकेल्स यांच्या ‘ऑपेरा’चे क्रायुफ हे मैदानावरील ‘कंडक्टर’ होते. सैद्धांतिक बैठक मिकेल्स यांची होती. पण तिला मूर्तरूप देण्याची अवघड जाबदारी क्रायुफ यांनाच पार पाडायची होती. कोणत्या खेळाडूकडे अधिक अवकाश आहे? कोणत्या खेळाडूकडे अधिक वेळ आहे? कारण अवकाश (जागा या अर्थी) आणि वेळ हाताशी असेल, तर गोल करण्याची संधी सर्वाधिक असते. हे जागच्या जागी थिजून किंवा बेभान, दिशाहीन धावूनही साधणार नाही. ते परिप्रेक्ष्य निर्माण करावे लागेल. यासाठी चेंडूचा ताबा अधिकाधिक स्वतःकडे ठेवावा लागेल. तो नसेल, तर प्रतिस्पर्ध्याचा अवकाश आक्रसून टाकण्यासाठी समोरच्या हाफमध्ये झुंडीने जायचे. टोटल फुटबॉलच्या मुळाशी अशा अनेक संकल्पना होत्या. ते जितके कागदावर मनोहारी भासते, तितकेच प्रत्यक्ष मैदानावर राबवणे अवघड नि आव्हानात्मक होते. पण क्रायुफ यांच्या संघाला ती किमया साधली. विरोधाभास म्हणजे, टोटल फुटबॉल ही संकल्पना म्हणून अल्पजीवी ठरली, कारण यात अपेक्षित उत्तम फुटबॉलपटू आणि त्यांच्यातील समन्वय-सहकार्य भान असा योग जुळून येणे दुर्मिळातील दुर्मिळ बाब होती.
स्पेनच्या संघात दोन्हींचा मेळ?
टोटल फुटबॉलच्या खुणा आजच्या स्पॅनिश संघाच्या खेळात दिसून येतात. कारण टिकी-टाका हा टोटल फुटबॉलचाच एक आविष्कार होता. क्रायुफ पुढे बार्सिलोनाचे प्रशिक्षक बनले, तेव्हा त्यांनी टोटल फुटबॉ़लमधील काही तत्त्वे तेथे राबवली. पेप गार्डियोला हे क्रायुफ यांचे पट्टशिष्य. त्यातून टिकी-टाकाचा जन्म झाला. पुढे एक अख्खी पिढी या तत्त्वज्ञानावर, संकल्पनेवर पोसली गेली. पण टिकी-टाकाच्या मर्यादा गतशतकात उघड्या पडू लागल्या. छोट्या पासेसनी गोल होतातच असे नव्हे. शिवाय बचावफळी मजबूत नसेल, तर टिकी-टाका धोकादायक ठरू शकते. मेसी, रोनाल्डो परिपक्व झाले तेव्हा आणि एम्बापे, केनसारखे फुटबॉलपटू विकसित झाल्यानंतर टिकी-टाका तितकी प्रभावी ठरत नव्हती. यात बदल करण्याची आवश्यकता होती. तो बदल घडवून आणला स्पेनचे विद्यमान प्रशिक्षक लुइस डे ला फ्युएंटे यांनी. टिकी-टाकाची मूलभूत संकल्पना कायम ठेवताना, फ्युएंटे यांनी त्यात दीर्घ आणि हवेतील पासेसची पेरणी केली. तसेच चेंडूवरील ताबा सोडायचा नाही, सुटला तर परत मिळवण्यासाठी प्रतिस्पर्धी खेळाडूकडे एकापेक्षा अधिक खेळाडूंनी तुटून पडायचे हे डावपेच त्यांनी राबवले. या स्पर्धेत केप व्हर्डेविरुद्ध ते फार यशस्वी ठरले नाही. पण उरुग्वेविरुद्धच्या सामन्यापासून स्पेनचा संघ प्रभावी ठरू लागला. प्रतिस्पर्ध्याला चेंडूचा ताबा फारसा मिळायचाच नाही. त्यामुळे गोल करण्याच्या संधीही आटायच्या. या डावपेचाचा परमोच्च बिंदू फ्रान्स आणि अर्जेंटिनाविरुद्ध पाहायला मिळाला. फ्रान्सला उपान्त्य सामन्यात ८४व्या मिनिटापर्यंत स्पॅनिश गोलच्या दिशेने फटका लगावण्याची संधीच मिळाली नाही. अंतिम सामन्यात तर अर्जेंटिनाला एकदाही अशी संधी मिळाली नाही! स्पेनच्या या बदललेल्या शैलीचा थांग कोणत्याही मोठ्या संघाला लावता आलेला नाही. विशेष म्हणजे, स्पेनच्या विद्यमान संघातील बहुतेक खेळाडूंनी युवा वयातच ही शैली आत्मसात केली आहे. यांतील बहुतेक जण ज्या स्पॅनिश युवा संघातून आले किंवा येताहेत त्या संघांचे प्रशिक्षकपद फ्युएंटे यांच्याकडेच होते. त्यांनी आजवर कोणत्याही क्लबला मार्गदर्शन केलेले नाही. पण अंडर-१७, अंडर-२१ अशा संघांचे ते प्रशिक्षक होते. त्यामुळेच २०२३पासून ते प्रशिक्षक झाल्यानंतर स्पेन सातत्याने जिंकू लागला आहे. इतर संघांसाठी ही शैली आत्मसात होणे अवघड आहे, कारण कोणत्याच देशात युवा स्तरापासून अशा प्रकारे मुलांना प्रशिक्षित केले जात नाही. त्यामुळे इथून पुढे बराच काळ स्पेनच्या संघाचे जागतिक फुटबॉलमध्ये वर्चस्व राहील हे नक्की.
siddharth.khandekar@expressindia.com
