टी-२० विश्वचषक २०२६ भारत आणि श्रीलंकेच्या यजमानपदाखाली खेळवला जाणार आहे. टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. ज्यामध्ये सूर्यकुमार यादव कर्णधार तर अक्षर पटेल उपकर्णधार असणार आहे. टी-२० विश्वचषकापूर्वी संघ न्यूझीलंडविरूद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. पण यापूर्वी भारतीय संघाच्या महत्त्वाच्या खेळाडूला जबर दुखापत झाली असून त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
टी-२० वर्ल्डकप २०२६ पूर्वी न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर आला आहे. सुरूवातीला दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका येत्या ११ जानेवारीपासून सुरू होणार आहे. तर २१ जानेवारीपासून टी-२० मालिकेला सुरूवात होणार आहे.
भारताच्या आशिया चषक अंतिम सामन्याचा हिरो ठरलेला आणि मधल्या फळीतील फलंदाज तिलक वर्मा याच्या पोटाला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतून तो बाहेर पडू शकतो. २१ जानेवारीपासून नागपूरमध्ये सुरू होणाऱ्या मालिकेसाठी संघ इतर खेळाडूला संधी देऊ शकतो. भारताचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार शुबमन गिलचा विचार केला जाण्याची शक्यता कमी आहे.
तिलक राजकोटमध्ये विजय हजारे ट्रॉफी खेळत होता. बुधवारी सकाळी नाश्त्यानंतर त्याच्या अचानक पोटात दुखू लागलं. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार त्याने बेंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई) मधील डॉक्टरांचा सल्ला घेतला आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनीही याबाबत सांगताना म्हटलं, “तिलकला आज (बुधवार) तीव्र पोटदुखीचा त्रास झाला. त्याला ताबडतोब राजकोट येथील रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे अनेक स्कॅन करण्यात आले आणि रिपोर्ट्स सीओई डॉक्टरांना पाठवण्यात आले.”
“डॉक्टरांनी त्याला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे, ज्यातून बरे होण्यासाठी तीन ते चार आठवडे लागतील. न्यूझीलंडविरुद्ध संपूर्ण टी-२० मालिका खेळण्याची त्याची शक्यता कमी दिसते,” असे सूत्रांनी सांगितले. ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषकात तिलक खेळणार की नाही याची भारताला अधिक चिंता असेल. भारताचा पहिला सामना अमेरिकेविरुद्ध आहे.
तिलक वर्माच्या जागी कोणत्या खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता
तिलकच्या जागी निवड समिती कोणाची निवड करते यावर सर्वांच्या नजरा असणार आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी आणि विश्वचषकासाठी शुबमन गिलकडे दुर्लक्ष करण्यात आले होते आणि तिलकच्या जागी त्याची निवड होण्याची शक्यता कमी आहे. निवड समिती आणि संघ व्यवस्थापन त्याची निवड करण्यासाठी तयार नसल्याचे समजते. कारण भारताचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार सामन्यांदरम्यान बेंचवर बसणं चुकीचं दिसेल. याशिवाय खांद्याच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झाला तर आसामचा रियान पराग हा एक पर्याय असू शकतो.
