Tilak Varma Indian Flag Viral Video: विश्वविजेत्या भारतीय संघावर सध्या टी-२० विश्वचषक २०२६च्या विजयानंतर कौतुकाचा वर्षाव होत आहे. टीम इंडियाने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाचा पराभव करत विक्रमी तिसऱ्यांदा स्पर्धेचं जेतेपद पटकावलं. भारताच्या या विश्वविक्रमी वर्ल्डकप विजयानंतर संपूर्ण संघ अहमदाबादच्या मैदानावर विजयाचा आनंद साजरा करताना दिसला. संपूर्ण भारतीय संघ या विजयाचा आनंद साजरा करत होता. यादरम्यान तिलक वर्माचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हीडिओनंतर चाहते तिलकचं कौतुक करत आहेत.

तिलक वर्मा हा २०२६ च्या टी-२० विश्वचषक संघातील सर्वात तरूण खेळाडू होता. तिलकने वयाच्या २३व्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान पटकावला. तिलक वर्माने अभिषेक शर्माच्या गोलंदाजीवर झेल टिपत संघाला अखेरची विकेट मिळवून दिली आणि विजयावर शिक्कामोर्तब केला. या विजयानंतर तिलक वर्मा तिरंगा घेऊन सेलिब्रशेन करतानाचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. पण यादरम्यान त्याच्याकडून नकळत एक चूक घडली.

भारताच्या विजयानंतर विक्ट्री लॅपदरम्यान तिलक वर्मा अभिमानाने भारतीय तिरंगा फडकावताना दिसला. भारतीय संघाचा महत्त्वाचा सदस्य बनलेला हा युवा फलंदाज सहकाऱ्यांसोबत आणि चाहत्यांसोबत या ऐतिहासिक क्षणाचा आनंद घेत होता. मात्र जल्लोषाच्या दरम्यान तिरंगा ध्वजदांड्यामधून सटकला आणि झेंडा खाली पडला. पण तिलकला याबाबत कल्पनाच नव्हती. तो दांडा फिरवत होता, पण काही वेळानंतर त्याला लक्षात आलं की झेंडा खाली पडला आहे.

दरम्यान सपोर्ट स्टाफमधील एका सदस्याने तिरंगा उचलला आणि साफ करत आपल्या डोक्याला लावत पुन्हा त्याच्याकडे दिला. काय घडलं हे समजताच तिलकने अत्यंत नम्रता आणि आदराने प्रतिक्रिया दिली. तिलकला जसा तिरंगा परत हाती दिला, त्याने तिरंगा आपल्या कपाळाला लावला आणि तिरंगाला किस केलं. नकळत घडलेल्या या घटनेबद्दल तिलकने जणू माफी मागितल्यासारखी प्रतिक्रिया दिली, कारण तिरंग्याचे महत्त्व प्रत्येक भारतीयासाठी किती मोठं आहे याची त्याला पूर्ण जाणीव होती.

तिलकच्या प्रसंगाने मैदानातील प्रेक्षकांसह सोशल मीडियावरही सर्व जण त्याचं कौतुक करत आहेत. अनेकांनी तिलकने राष्ट्रीय ध्वजाबद्दल दाखवलेल्या आदराचं कौतुक केलं. देशासाठी खेळताना खेळाडूंमध्ये असलेली अभिमानाची भावना आणि जबाबदारी त्याच्या या प्रतिक्रियेतून स्पष्टपणे दिसून आली, असंही अनेकांनी म्हटलं.

२०२६ च्या टी-२० विश्वचषकात, तिलक वर्माने सर्व नऊ सामने खेळले. यादरम्यान त्याने २९.५७ च्या सरासरीने आणि १५४.४७ च्या स्ट्राईक रेटने २०७ धावा केल्या, त्यात १८ चौकार आणि ११ षटकारांचा समावेश आहे.