Tilak Varma Super Over Controversy With Umpires: भारतीय अ संघ सध्या श्रीलंकेत आहे. भारत अ, श्रीलंका अ आणि अफगाणिस्तान अ या तिन्ही संघांमध्ये तिरंगी मालिकेचा थरार सुरू आहे. श्रीलंकेतील डंबुला येथे पार पडलेल्या भारत अ आणि श्रीलंका अ या दोन्ही संघांमध्ये थरारक सामना रंगला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाचा संपूर्ण डाव ४९.२ षटकात २६५ धावांवर आटोपला. या धावांचा बचाव करताना भारताकडून अर्शद खानने पुन्हा एकदा निर्णायक षटक टाकलं. शेवटी हा सामना बरोबरीत सुटला. सामना बरोबरीत सुटल्यानंतर सामन्याचा निकाल लागावा म्हणून तिलक वर्मा सुपर ओव्हर खेळवण्यासाठी अंपायरला विनंती करताना दिसला. पण अंपायर्स विरोध करत असतानाही तिलक सुपर ओव्हरची मागणी करताना दिसून आला. शेवटी सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाला हा सामना गमवावा लागला आहे.

या सामन्यात श्रीलंकेचा संघ २६६ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला होता. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेला चांगली सुरुवात मिळाली होती. निरोशन डिकवेलाने ३७ तर अविष्का फर्नांडोने २२ धावा केल्या. यादरम्यान सदीरा समरविक्रमाचं शतक थोडक्यात हुकलं. तो ९३ धावांवर माघारी परतला. श्रीलंकसमोरील आव्हान फार मोठं नव्हतं. फलंदाजांनी हे आव्हान गाठण्यासाठी पूर्ण जोर लावला. पण शेवटी भारतीय गोलंदाजांनी विकेट्स घेऊन दमदार पुनरागमन केलं. भारताकडून शेवटचे षटक टाकण्यासाठी अर्शद खान गोलंदाजीला आला. श्रीलंकेला सामना जिंकण्यासाठी शेवटच्या षटकात ५ धावा करायच्या होत्या. हा सामना १ चेंडू आणि २ धावांपर्यंत पोहोचला. शेवटच्या चेंडूवर श्रीलंकेच्या फलंदाजांनी १ धाव पूर्ण केली आणि सामना बरोबरीत सुटला.

तिलक वर्मा अन् अंपायरमध्ये वाद

तर झाले असे की, सामना बरोबरीत सुटल्यानंतर श्रीलंकेचे खेळाडू आणि अंपायर्स १-१ गुण वाटून घेण्यासाठी तयार होते. पण तिलक वर्मा सामन्याचा निकाल लावण्यासाठी सुपर ओव्हर खेळवण्यात यावी अशी विनंती करताना दिसून आला. पण अंपायर्स या गोष्टीच्या विरोधात होते. ६ नंतर सहसा अंधार पडतो आणि फ्लड लाईट्स नसल्याने सुपर ओव्हर खेळवता येणार नाही, असं अंपायर्स सांगत असतानाही तिलकने अंपायर्ससोबत वाद घातला आणि सुपर ओव्हर खेळवण्यासाठी तयार केलं. अंपायर्सने हा निर्णय घेण्यासाठी बराच वेळ घेतला. ज्यावेळी श्रीलंकेचे फलंदाज फलंदाजी करत होते, त्यावेळी चेंडू स्पष्टपण दिसत होता. पण भारतीय फलंदाज आले, त्यावेळी कमी प्रकाशामुळे चेंडू दिसत नव्हता. पण नियमानुसार भारतीय संघाला ही सुपर ओव्ह खेळावी लागली.

सुपर ओव्हरमध्ये भारताचा पराभव

सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेकडून अविष्का फर्नोडो आणि सहन अराचिंगेची जोडी मैदानावर आली. तर भारतीय संघाकडून सुपर ओव्हर टाकण्यासाठी अर्शद खान गोलंदाजीला आला. या षटकात श्रीलंकेच्या फलंदाजांनी १६ धावा वसूल केल्या. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १७ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून वैभव सूर्यवंशी आणि सूर्यांश शेडगेची जोडी मैदानावर आली. पण या जोडीला १७ धावा करता आल्या नाहीत. भारतीय संघाला ९ धावांपर्यंत मजल मारता आली.