तिलक वर्मामधील अलौकिक प्रतिभेवर आम्हाला नेहमीच विश्वास होता. मात्र, त्याने आपल्या क्षमतेप्रमाणे खेळ दाखवणे गरजेचे होते आणि तो त्यात यशस्वी ठरल्याचा आनंद असल्याचे वक्तव्य मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने केले. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये सलग चार पराभवानंतर अखेर विजयाच्या मार्गावर परतलेल्या मुंबईसाठी तिलकने निर्णायक शतकी खेळी केली.

त्याच्या खेळीच्या जोरावर मुंबईने गुजरात टायटन्सचा ९९ धावांनी पराभव करत आपली निव्वळ धावगतीही सुधारली. मुंबईच्या संघाला अहमदाबाद येथे गुजरात टायटन्सकडून यापूर्वी सलग चार पराभव पत्करावे लागले होते. सोमवारी झालेल्या सामन्यातही मुंबईची सुरुवात अडखळती झाली होती. मात्र, अवघड खेळपट्टीवर तिलकने ४५ चेंडूंत नाबाद १०१ धावांची शानदार खेळी करत मुंबईला भक्कम धावसंख्या उभारून दिली.

तिलकने सुरुवातीच्या २२ चेंडूंत अवघ्या १९ धावा केल्या होत्या. परंतु दुसऱ्या ‘स्ट्रॅटेजिक टाइम-आऊट’मध्ये कर्णधार हार्दिकने त्याला अधिक मोकळेपणाने खेळण्याची सूचना केली. त्यानंतर त्याच्या फलंदाजीत आमूलाग्र बदल दिसला. “तिलककडे असलेली गुणवत्ता पाहता त्याने कोणतीही चिंता करू नये, असे मी त्याला सांगितले. फक्त चेंडू बघ आणि फटका मार, एवढाच मी त्याला संदेश दिला. तिलकने आज जे केले ते, त्याच्यासाठी, संघासाठी आणि मुंबई इंडियन्स फ्रँचायझीसाठी महत्त्वाचे होते,” असे हार्दिकने सामन्यानंतर सांगितले.

महत्त्वाचा विजय

अहमदाबादमध्ये गुजरात संघाविरुद्ध मुंबईचा हा पहिलाच विजय ठरला. हा विजय खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवणारा आणि संघाला योग्य मार्गावर आणणारा ठरू शकतो, असे हार्दिकला वाटते. “प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर जिंकणे खूप कठीण असते. अहमदाबाद आमच्यासाठी नेहमीच अवघड ठिकाण राहिले आहे. मात्र, या सामन्यात आम्ही चांगला खेळ केला. हा विजय खूप खास आहे. तो अत्यंत आवश्यक होता,” असे हार्दिकने नमूद केले.

टीकाकारांना प्रत्युत्तर

यंदाच्या ‘आयपीएल’ हंगामातील पहिल्या पाच सामन्यांत जसप्रीत बुमराची बळींची पाटी कोरी होती. मात्र, गुजरातविरुद्ध त्याला पहिले षटक टाकण्याची संधी मिळाली आणि त्याने पहिल्याच चेंडूवर गुजरातचा भरवशाचा फलंदाज साई सुदर्शनला माघारी धाडले. यापूर्वी बुमराला सुरुवातीची षटके न देण्याच्या निर्णयावर टीका केली जात होते. त्याला हार्दिकने प्रत्युत्तर दिले. “बुमराला सुरुवातीला षटक का देत नाहीस, असा प्रश्न लोक विचारत असतात. मात्र, त्याने १४० सामन्यांमध्ये फक्त ७-८ वेळाच पहिले षटक टाकले आहे. त्यामुळे ही केवळ हार्दिक पंड्या समस्या नाही. प्रत्येकच जण असा निर्णय घेताना दिसतो. बुमरा इतका खास आहे की अखेरच्या षटकांसाठी त्याला राखून ठेवावे असे प्रत्येकच कर्णधाराला वाटते,” असेही हार्दिक म्हणाला.

पहिले शतक खासच…

  • मुंबईचा डावखुरा फलंदाज तिलक वर्मा यंदाच्या ‘आयपीएल’ हंगामात धावांसाठी संघर्ष करत होता. पहिल्या पाच सामन्यांत मिळून त्याला ४३ धावाच करता आल्या होत्या. मात्र, गुजरात टायटन्सविरुद्ध त्याने अलौकिक प्रतिभेचे दर्शन घडवताना ‘आयपीएल’ कारकीर्दीतील पहिले शतक साकारले.
  • “पहिले शतक नेहमीच खास असते. आमच्या संघासाठी हा खूप महत्त्वाचा सामना होता. गेल्या काही सामन्यांत मला खेळपट्टीवर फार वेळ घालवता आला नव्हता. त्यामुळे या वेळी पहिल्या २० चेंडूंमध्ये मी संयमाने खेळलो आणि नंतर माझ्या क्षमतेनुसार आक्रमक झालो,” असे तिलकने सांगितले.
  • ‘‘मी केवळ परिस्थितीनुसार आणि संघाच्या गरजेनुसार खेळण्याचा प्रयत्न केला. माझ्यात सर्व प्रकारचे फटके मारण्याची क्षमता आहे. मात्र, जेव्हा संघ दडपणाखाली असतो, तेव्हा तुम्ही स्वत:च्या कौशल्यावर विश्वास राखणे आणि लक्षपूर्वक फलंदाजी करणे आवश्यक असते. त्यात यशस्वी ठरलो याचा आनंद आहे,’’ असेही तिलक म्हणाला.

गोलंदाजांच्या कामगिरीवर गिलची नाराजी

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या मोठ्या पराभवानंतर गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल स्पष्टपणे निराश दिसला. “गोलंदाजीत मधल्या षटकांत आम्ही खूप धावा दिल्या. या खेळपट्टीवर १६०-१७० ही योग्य धावसंख्या ठरली असती,” असे गिल म्हणाला. शेवटच्या तीन षटकांत (प्रसिध कृष्णाची दोन आणि अशोक शर्माचे एक षटक) एकूण ६७ धावा दिल्या गेल्याने गिल नाराज होता. “आम्ही योग्य टप्प्यावर चेंडू टाकू शकलो नाही. काही चेंडू चांगले होते, तर काही नव्हते. आमच्या कामगिरीत सातत्य नव्हते,” असे त्याने नमूद केले.