Tilak Varma Record: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज तिलक वर्माने दमदार अर्धशतकी खेळी केली. तिलकने ४२ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. त्याने ३० चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. या खेळीदरम्यान त्याने १० चौकार आणि १ षटकार खेचला. या अर्धशतकी खेळीदारम्यान त्याने भारताचे दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

विराट आणि रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. दरम्यान तिलक वर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकाच खेळीदरम्यान विराट आणि रोहित दोघांचाही मोठा विक्रम मोडून काढला आहे. तिलक वर्मा हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना टी- २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे.

तिलक वर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना आतापर्यंत १० सामन्यांमध्ये ४९६ धावा केल्या आहेत. तर रोहित शर्माच्या नावे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना १७ डावात ४२९ धावा करण्याची नोंद आहे. भारतीय टी -२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना १४ डावात ४०६ धावा केल्या आहेत. तर विराट कोहलीच्या नावे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना १३ डावात ३९४ धावा करण्याची नोंद आहे. तर हार्दिक पांड्याच्या नावे १५ डावात ३७३ धावा करण्याची नोंद आहे.

भारतीय संघाचा दमदार विजय

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मारक्रमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाकडून हार्दिक पांड्या आणि तिलक वर्माने अर्धशतकी खेळी केली. दोघांच्या अर्धशतकाच्या बळावर भारतीय संघाने २० षटकांअखेर २३१ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला २०१ धावांपर्यंत मजल मारता आली. भारतीय संघाने हा सामना ३० धावांनी जिंकून मालिका ३-१ ने आपल्या नावावर केली.