Tilak Varma Credits Rohit Sharma For Return in Form: मुंबई इंडियन्सचा फलंदाज तिलक वर्माने गुजरात टायटन्सविरुद्धच्या विजयी शतकानंतर आपल्या फॉर्ममध्ये परतण्यासाठी माजी कर्णधार रोहित शर्माच्या सल्ल्याला श्रेय दिलं आहे. गुरुवारी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी बोलताना रोहित शर्माने दिलेल्या सल्ल्याचा तिलक वर्माने खुलासा केला. रोहित शर्माने दिलेला सल्ला तिलकला खेळी साकारण्यासाठी उपयोगी पडल्याचं त्याने सांगितलं.

तिलक वर्मा हा टी-२० च्या फॉरमॅटप्रमाणे पहिल्याच चेंडूपासून फटकेबाजी करत नाही, तो हळूहळू स्वत:ची खेळी साकारतो आणि मग स्फोटक फलंदाजी करत सर्व गोलंदाजांवर हावी होतो. मुंबई इंडियन्सच्या गुजरात टायटन्सविरुद्धच्या मागील सामन्यात याचं ताजं उदाहरण पाहायला मिळालं. पॉवरप्लेनंतर संघ अडचणीत असताना डावखुरा तिलक वर्मा फलंदाजीला आला. आपल्या डावाच्या पहिल्या टप्प्यात त्याने घाई न करता शांतपणे खेळ करत स्ट्राईक रोटेट करण्यावर भर दिला आणि २२ चेंडूत १९ धावांवर होता.

सामना सुरू असतानाच चांगली खेळी करत असलेला नमन धीर १३व्या षटकात ३२ चेंडूत ४५ धावा करून बाद झाला. त्यानंतर तिलकच्या फलंदाजीचा वेग अचानक वाढला. २२ चेंडूत १९ धावांवरून त्याने पुढील २३ चेंडूत तब्बल ८२ धावा ठोकत शानदार शतक झळकावलं. हे शतक मुंबई इंडियन्ससाठी सर्वात जलद शतकांपैकी एक ठरलं.

रोहित शर्माने तिलक वर्माला सामन्यापूर्वी काय सल्ला दिला होता?

तिलकन बुधवारी सीएसकेविरूद्ध सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत सांगितलं, “मी खास करून रोहित (शर्मा) भाईशी बोलत होतो. तो मला म्हणाला, ‘तू फक्त १५-२० चेंडू खेळ, तुला तुझी क्षमता माहिती आहे. १५ चेंडू खेळल्यानंतर तू काय करू शकतोस, ते आम्हा सगळ्यांना माहिती आहे. सामन्याची स्थिती बघू नकोस, काहीही विचार करू नकोस. आधी १५ चेंडू खेळ, त्यानंतर काय होतं ते पाहू. या सल्ल्यामुळे मला आत्मविश्वास मिळाला. एकदा मी १५ चेंडू खेळून काढले आणि त्यानंतर मला कळलं की आता मी आक्रमक फटके खेळू शकतो.”

दरम्यान, आगामी सामन्यासाठी रोहित शर्मा उपलब्ध असेल की नाही, याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. तो सध्या मैदानावर फिटनेस लक्ष केंद्रित करत असून अंतिम निर्णय गुरुवारी संध्याकाळी होणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध सामन्यापूर्वी घेतला जाणार आहे. आयपीएलमधील दोन्ही संघांच्या या एल क्लासिको सामन्यात रोहित शर्मा व एम एस धोनी खेळणार की नाही, यावर सर्वांच्या नजरा आहेत.