एल क्लासिको सामना म्हणजेच चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात आपल्याला कडवी टक्कर पाहायला मिळते. कायमच होणाऱ्या या हायव्होल्टेज लढतीत या सामन्यात मैदानावरील वातावरण तापलेलं पाहायला मिळालं. मुंबई इंडियन्सचा फलंदाज तिलक वर्मा आणि चेन्नईचा गोलंदाज जेमी ओवर्टन यांच्यात मैदानावरच बाचाबाची झाली. ज्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.
चेन्नई सुपर किंग्सने संजू सॅमसनच्या शतकाच्या बळावर सीएसकेने २०७ धावा केल्या. प्रत्युत्तरात, मुंबईची अवस्था ११ धावांवर तीन गडी बाद अशी बिकट झाली होती. त्यानंतर तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादवने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण संघाला विजयापर्यंत घेऊन जाण्यात अपयशी ठरला. यादरम्यान तिलक आणि ओव्हरटन यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली.
तिलक वर्मा आणि जेमी ओवर्टन यांच्यात नेमकं काय घडलं?
डावाच्या १०व्या षटकात तिलक वर्मा ओवर्टनविरुद्ध आक्रमक दिसून आला. षटकाच्या सुरुवातीलाच चौकार मारून त्याने आपला इरादा स्पष्ट केला आणि नंतर दुसऱ्याच चेंडूवर दोन धावा काढून गोलंदाजावर दबाव आणला. ओवर्टनने एक स्लोअर चेंडू टाकला, जो तिलकने मिड-विकेटच्या दिशेने खेळून दोन धावा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, धोका ओळखून सूर्यकुमार यादवने धाव घेण्यास नकार दिला. खरंतर षटकादरम्यान वादाला सुरूवात झाली. जेमी ओवर्टनच्या षटकात तो गोलंदाजीला तयार झाल्यानंतर तिलक वर्मा दोन वेळा क्रीझवरून लांब गेला होता. यामुळे ओवर्टन आधीच संतापला होता. षटक पूर्ण झाल्यानंतर याबाबत त्याने तिलकशी वाद घातला.
चेंडू टाकल्यानंतर ओवर्टन आणि तिलक यांच्यात अचानक शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. वाद दोघांमध्ये चांगलाच वाढला आणि दोन्ही खेळाडू एकमेकांच्या अगदी जवळ आले.
परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून, नॉन-स्ट्राईकरच्या बाजूला असलेल्या सूर्यकुमार यादवने तात्काळ हस्तक्षेप केला. सूर्याने केवळ तिलकला शांत केलं नाही तर ओवर्टनशीही संवादही साधला. परिस्थितीतील वाढता तणाव पाहून पंचांना हस्तक्षेप करावा लागला. पंचांनी तात्काळ हस्तक्षेप करून जेमी ओवर्टनला तिलकपासून दूर केलं.
