Tilak Varma In Team India ODI Squad: आगामी आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२७ स्पर्धेचा थरार दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियात रंगणार आहे आहे. या स्पर्धेची सुरुवात ४ ऑक्टोबरपासून होणार आहे. भारतीय संघाने याआधी २०११ मध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवला होता. त्यानंतर २०१५, २०१९ आणि २०२३ मध्ये झालेल्या स्पर्धेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. आगामी वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी बीसीसीआयने संघबांधणी करायला सुरूवात केली आहे. दरम्यान या स्पर्धेसाठी तिलक वर्माला देखील संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा रंगली आहे.

आगामी वनडे वर्ल्डकप स्पर्धेत शुबमन गिल भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या स्पर्धेत खेळणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केलाद जातोय. पण दोघांचा सध्याचा फॉर्म पाहता, दोघेही आगामी वनडे वर्ल्डकप स्पर्धेत खेळताना दिसून येऊ शकतात. या स्पर्धेत रोहित शर्मा आणि शुबमन गिलची जोडी डावाची सुरुवात करताना दिसू शकते. तर विराट कोहली नेहमीप्रमाणे तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसून येऊ शकतो. त्यानंतर केएल राहुल आणि श्रेयस अय्यर खेळताना दिसू शकतात. टॉप ऑर्डरच्या फलंदाजांपैकी एखादा फलंदाज दुखापतग्रस्त झाला, तर त्याचा बॅकअप खेळाडू तयार आहे. पण मिडल ऑर्डरमध्ये असा एकही खेळाडू नाही, जो बॅकअप असू शकतो.

ही समस्या दूर करण्यासाठी टीम मॅनेजमेंटने एक खास प्लॅन तयार केला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, टीम मॅनेजमेंट आणि निवडकर्ते तिलक वर्मावर लक्ष ठेवून आहेत. आगामी वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी त्याला बॅकअप खेळाडू म्हणून संधी दिली जाऊ शकते. सध्या जो फलंदाजीक्रम आहे, त्यामध्ये टॉप ५ फलंदाज उजव्या हाताचे आहेत. त्यामुळे एक डावखुरा फलंदाज येणं भारतीय संघासाठी फायदेशीर ठरेल. तसेच तिलक वर्मा फलंदाजीसह गोलंदाजीतही योगदान देऊ शकतो. त्यामुळे टीम इंडियासाठी गोलंदाजीचे पर्याय आणखी वाढणार आहेत.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, आगामी वर्ल्डकप स्पर्धेसाठी निवडकर्ते मिडल ऑर्डरच्या बॅकअप खेळाडूच्या शोधात आहेत. श्रेयस अय्यर अनेकदा दुखापतीमुळे संघाबाहेर असतो, त्यामुळे त्याचा बॅकअप म्हणून तिलक वर्माच्या नावाचा विचार केला जात आहे. सध्या तो टी-२० संघाचा उपकर्णधार आहे. त्याला फलंदाजीसह आपल्या गोलंदाजीवरही मेहनत घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत वेस्ट इंडिजचा संघ वनडे मालिकेसाठी भारतात येणार आहे. त्यानंतर न्यूझीलंड दौऱ्यावरही भारतीय संघ वनडे मालिका खेळणार आहे. या दौऱ्याहून भारतीय संघाची प्लॅनिंग सुरू होणार आहे. बीसीसीआयच्या एका सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, “गौतम गंभीर आणि कर्णधार शुबमन गिलला असं वाटतं की, मिडल ऑर्डरसाठी कुठलाही बॅकअप खेळाडू नाही. हार्दिक पंड्या आणि नितीश कुमार रेड्डी हे दुखापतीमुळ बाहेर असतात, हे पाहता बीसीसीआयला असा खेळाडू हवा आहे जो ४ षटकं टाकू शकतो.”