Tilak Varma Runout: इंदूरमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना सुरू आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. या डावात भारतीय संघाने सुरूवात दमदार केली होती. पण मधल्या षटकांमध्ये भारतीय फलंदाज एकापाठोपाठ एक माघारी परतले. यादरम्यान तिलक वर्मा ज्या पद्धतीने धावबाद झाला, त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.
असं कोण आऊट होतं?
तर झालं असं की, पहिल्या डावातील १७ वे षटक टाकण्यासाठी वेस्ट इंडिजकडून गुडाकेश मोती गोलंदाजीला आला. या षटकात अक्षर पटेल आणि तिलक वर्माची जोडी मैदानावर होती. षटकातील चौथ्या चेंडूवर अक्षर पटेलने फटका मारला. त्यावेळी दोन्ही फलंदाजांना वाटलं की, चेंडू ४ धावांसाठी गेला त्यामुळे १ धाव घेतल्यानंतर दोन्ही फलंदाज थांबून गेले. वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी चेंडू उचलला आणि आधी स्ट्राईकवर असलेल्या अक्षर पटेलच्या दिशेने फेकला. पण अक्षर पटेल क्रिझमध्ये पोहोचला होता. त्यानंतर शे होपने नॉन स्ट्राईकवर असलेल्या तिलक वर्माला बाद करण्यासाठी गुडाकेशच्या दिशेने थ्रो केला. त्यावेळी तिलक वर्मा चालत येत होता, तो सहज पोहोचू शकला असता. पण क्रिझमध्ये पोहोचू न शकल्याने त्याला धावबाद होऊन माघारी परतावं लागलं.
भारतीय संघाने केल्या २२३ धावा
या सामन्यात भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण मिळालं होतं. डावाच्या सुरूवातीलाच भारतीय संघाला मोठा धक्का बसला. सलामीला आलेला अभिषेक शर्मा स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर अभिषेक शर्मा आणि इशान किशनने मिळून भारतीय संघाचा डाव सावरला. दोघांनी मिळून शतकी भागीदारी केली. अभिषेक शर्माने ६९ धावा केल्या. तर इशान किशन ३७ धावांवर माघारी परतला. कर्णधार श्रेयस अय्यर अवघ्या एका धावेवर माघारी परतला. त्यानंतर तिलक वर्मा सेट झाला होता, पण एका चुकीमुळे तो धावबाद होऊन माघारी परतला.
दमदार सुरूवात, फ्लॉप शेवट
भारतीय संघाने ज्या पद्धतीने डावाची सुरूवात केली होती, त्यानुसार २५० धावा सहज होऊ शकल्या असत्या. पण एकापाठोपाठ एक विकेट्स गेल्याने धावांची गती मंदावली. अभिषेक शर्माने वादळी सुरूवात करून दिली होती. पण त्यानंतर इशान किशन आणि श्रेयस अय्यर एकापाठोपाठ एक बाद झाले. त्यानंतर शेवटी तिलक वर्मा आणि अक्षर पटेल देखील निर्णायक क्षणी धावबाद होऊन माघारी परतले.
