Tilak Varma Century: गुजरात टायटन्सविरूद्ध सुरु असलेल्या सामन्यात तिलक वर्माने दाखवून दिलं आहे की, मी पण कोणापेक्षा कमी नाही. आतापर्यंत आयपीएल २०२६ स्पर्धेत तिलक वर्माला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. गुजरात टायटन्सविरूद्धच्या सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. त्याने ते करुन दाखवलं. त्याला हवी तशी सुरुवात मिळाली नव्हती. पण शेवट मात्र दमदार केला. या डावात फलंदाजी करताना त्याने ४५ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केलं. या खेळीदरम्यान त्याने ८ चौकार आणि ७ षटकार खेचले. हे त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिलेच शतक आहे.
या सामन्यात मुंबई इंडियन्सला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. सुरुवातीलाच मोठे धक्के बसल्यानंतर तिलक वर्मा पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. या सामन्यात धावा करण्यासह त्याला टिकून फलंदाजी करायची होती. त्यामुळे त्याने सुरुवातीला सावध पवित्रा घेतला. पण शेवटच्या षटकांमध्ये त्याने गुजरात टायटन्स संघातील गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याने या स्पर्धेतील सर्वात वेगवान गोलंदाज अशोक शर्माच्या एकाच षटकात २६ धावा वसूल केल्या.
तिलकने अवघ्या ३३ चेंडूंमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर शेवटच्या ४ षटकांमध्ये त्याने गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांवर चांगलाच हल्लाबोल केला. यादरम्यान त्याने शेवटच्या २३ चेंडूंमध्ये ८२ धावा जोडल्या. १४ व्या षटकात फलंदाजी करत असताना त्याने २२ चेंडूंमध्ये १९ धावा केल्या होत्या. त्यानंतर २० व्या षटकाच्या समाप्तीनंतर त्याने नाबाद ४५ चेंडूंमध्ये १०१ धावांची खेळी केली. हे त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिलंच शतक आहे.
मुंबईने केल्या १९९ धावा
या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सला पावरप्लेमध्येच ३ मोठे धक्के बसले. दानिश मालेवार २, क्विंटन डीकॉक १३ आणि सूर्यकुमार यादव अवघ्या १५ धावा करून माघारी परतला. कगिसो रबाडाने पावरप्लेमध्येच मुंबई इंडियन्सला ३ मोठे धक्के दिले. त्यानंतर नमन धीर आणि तिलक वर्माने मिळून संघाचा डाव सांभाळला नमन धीरने ४५ धावांची खेळी केली. तर हार्दिक पंड्याने १५ धावांची खेळी केली. तिलक वर्मा १०१ धावांवर नाबाद राहिला.
