Tim David 129 M. Longest Six Video: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिकेतील तिसरा सामना होबार्टमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या टीम डेव्हिडने चौकार-षटकारांचा पाऊस पाडत उत्कृष्ट खेळी केली. त्याने अवघ्या २३ चेंडूत अर्धशतक झळकावलं. या खेळीदरम्यान त्याने १२९ मीटरचा गगनचुंबी षटकार लगावला. त्याच्या षटकाराचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

टिम डेव्हिडने त्याच्या उत्कृष्ट षटकारांनी सर्वांचं लक्ष वेधलं. उजव्या हाताच्या फलंदाजाने फक्त २३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केलं. टीम डेव्हिडने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात लांब षटकार देखील खेचला. हा षटकार अक्षर पटेलच्या षटकात त्याने लगावला.

टिम डेव्हिडने ११० किंवा १२० मीटर नव्हे तर १२९ मीटर लांब षटकार मारला, जो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासातील सर्वात लांब षटकार आहे. ऑस्ट्रेलियन डावाच्या सातव्या षटकात अक्षर पटेल गोलंदाजीला आला. अक्षर पटेलने डेव्हिडला फुल लेंग्थ चेंडू टाकला, जो डेव्हिडने दणदणीत षटकारासाठी धाडला. चेंडू होबार्ट स्टेडियमच्या छतावर पडला आणि हा षटकार १२९ लांबीचा होता. डेव्हिडने स्वत: लगावलेला षटकार पाहूनच भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. डेव्हिडने या षटकात दोन षटकार खेचले.

टीम डेव्हिड चौथ्या क्रमांकावर वादळी फॉर्मसह फलंदाजीला उतरला. पुढच्याच षटकात टिम डेव्हिडने शिवम दुबेच्या गोलंदाजीवर जोरदार हल्लाबोल केला. त्याने या षटकात तीन चौकार लगावले आणि फक्त २३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. अखेरीस शिवम दुबेनेच टीम डेव्हिडला बाद केलं. डेव्हिडने ३८ चेंडूत ८ चौकार व २ षटकारांसह ७४ धावा केल्या.

टिम डेव्हिडने या खेळीदरम्यान एक खास विक्रमही केला. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० षटकार लगावण्याचा विक्रम नावे केला. तो फक्त ९३१ चेंडूत सर्वात जलद १०० षटकार लगावणारा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला. ७८९ चेंडूत १०० टी-२० षटकार मारणाऱ्या एविन लुईसनंतर तो जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.