Tim David Viral Video: आयपीएल २०२६ स्पर्धेतील ५४ वा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सला १६६ धावा करता आल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. शेवटच्या चेंडूवर २ धावांची गरज असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने हा सामना खिशात घातला. दरम्यान या सामन्यानंतर टिम डेव्हिडचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे.

मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात टिम डेव्हिड फलंदाजीत हवं तितकं योगदान देऊ शकला नाही. पण सामना झाल्यानंतर केलेल्या कृतीमुळे तो सोशल मीडियावर चर्चेत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या विजयामुळे मुंबई इंडियन्सचं या हंगामातील आव्हान संपुष्टात आलं आहे. या सामन्यानंतर विजयाचा जल्लोष करताना टिम डेव्हिडची कथित प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहे.

टिम डेव्हिडचा व्हिडीओ होतोय व्हायरल

ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू टिम डेव्हिडने ३ हंगामात मुंबई इंडियन्स संघाचं प्रतिनिधित्व केलं. २०२५ मध्ये झालेल्या लिलावाआधी मुंबई इंडियन्सने त्याला रिलीझ केलं होतं. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने त्याला आपल्या संघात स्थान दिलं. तेव्हापासून त्या संघाच्या मधल्या फळीतील प्रमुख फलंदाज आहे. मात्र, मुंबई इंडियन्सविरूद्ध झालेल्या सामन्यात तो शून्यावर बाद होऊन माघारी परतला. शेवटच्या चेंडूवर २ धावांची गरज असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने हा सामना जिंकला. विजयानंतर जोरदार जल्लोष झाला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असा दावा केला जात आहे की, मुंबईच्या पराभवानंतर टिम डेव्हिड डगआऊटमधून मधलं बोट दाखवताना दिसून आला. पण हा व्हिडीओ मुंबई इंडियन्सविरूद्धच्या सामन्यानंतरचा आहे की नाही, हे स्पष्ट झालेलं नाही. पण टिम डेव्हिडने असा इशारा करणं चुकीचं आहे, असं अनेकांचं म्हणणं आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा शेवटच्या चेंडूवर विजय

रायपूरमध्ये पार पडलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला होता. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने १६६ धावा केल्या. मुंबईकडून तिलक वर्माने सर्वाधिक ५७ धावांची खेळी केली. तर नमन धीरने ४७ धावा केल्या. तर रोहित शर्माने २२ धावांचे योगदान दिले. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून कृणाल पंड्याने ७३ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने हा सामना २ गडी राखून आपल्या नावावर केला.