Big Blow to RCB After IPL 2026 Win: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएल २०२६ चे विजेतेपद पटकावून इतिहास घडवला. अहमदाबादमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात बंगळुरूने गुजरात टायटन्सला ५ गडी राखून पराभूत करत सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. आता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सनंतर सलग दोन जेतेपदं पटकावणारा आरसीबी हा दुसरा संघ ठरला. आरसीबी या विजयाचा आनंद साजरा करत असताना संघाला मोठा धक्का बसला. स्टार खेळाडूवर बीसीसीआयने कारवाई केल्याने त्याच्यावर एका सामन्याती बंदी घालण्यात आली.

आरसीबीचे खेळाडू आणि चाहते या जेतेपदाचा आनंद साजरा करत असताना त्याच दिवशी संघाचा स्टार खेळाडू टिम डेव्हिडवर कारवाई करत बंदी घालण्यात आली. बीसीसीआयने मैदानातील नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल स्फोटक फलंदाज डेव्हिडवर एका सामन्याची बंदी घातली आणि त्याला दंडही ठोठावला.

आयपीएल फायनलच्या दुसऱ्या दिवशी, सोमवारी, १ जूनला बीसीसीआयने टीम डेव्हिडला दिलेल्या शिक्षेचा आणि त्यामागील कारणांचा तपशील देणारे एक प्रसिद्धीपत्रक जारी केले. बंगळुरू संघाकडून क्षेत्ररक्षण करताना आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल हा फलंदाज दोषी आढळला. निवेदनानुसार, गुजरातच्या डावातील १०व्या षटकात विकेट पडल्यानंतर डेव्हिडने पंच नितीन मेनन यांच्यावर आक्रमकपणे आईसबॅग फेकली होती.

बीसीसीआयच्या मते टीम डेव्हिडची कृती ही आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.९ चे उल्लंघन आहे, जे खेळाडू किंवा सामना अधिकाऱ्यांवर चेंडू किंवा कोणतीही वस्तू फेकण्याशी संबंधित आहे. डेव्हिडला लेव्हल-१ च्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आलं आणि त्याच्या सामना शुल्काच्या ५० टक्के दंड तसेच दोन डिमेरिट पॉइंट्स देण्यात आले. डेव्हिडने सामना पंचांसमोर आपली चूक कबूल केली आणि शिक्षा स्वीकारली.

टीम डेव्हिडवर का घातली एका सामन्याची बंदी?

डेव्हिडवर आता या कारवाईनंतर एका सामन्यासाठी बंदी घालण्यात आली आहे, कारण या सीझनमध्ये हा त्याचा तिसरा गुन्हा आहे आणि प्रत्येक वेळी त्याच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंट जोडण्यात आला आहे. त्याला पहिल्यांदा दंड हा सीझनच्या २०व्या सामन्यात देण्यात आला, ज्यासाठी त्याला एक डिमेरिट पॉइंट मिळाला. त्यानंतर त्याला ५४व्या सामन्यात पुढील शिक्षा मिळाली, ज्यात त्याच्या खात्यात दोन डिमेरिट पॉइंट्स जोडण्यात आले. त्याच्या तिसऱ्या गुन्ह्यानंतर, त्याचे एकूण डिमेरिट पॉइंट्स आता पाच झाले आहेत, ज्यामुळे त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे.

आता हा हंगाम संपल्यामुळे, टीम डेव्हिडवरील बंदी पुढील वर्षी बंगळुरु (किंवा इतर कोणत्याही संघाकडून) खेळताना लागू होईल. परिणामी, तो पुढील हंगामातील पहिला सामना खेळू शकणार नाही. एका हंगामासाठी बंदी घातलेला पण पुढच्या हंगामात शिक्षा भोगावा लागणारा डेव्हिड हा दुसरा खेळाडू आहे. यापूर्वी, आयपीएल २०२४ हंगामाच्या शेवटच्या सामन्यात, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या तिसऱ्यांदा स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळला होता आणि त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. परिणामी, तो २०२५ हंगामातील पहिला सामना खेळू शकला नाही.