Finn Allen Tim Seifert Record Partnership in T20 WC History: टी-२० विश्वचषक २०२६ मधील ११ वा सामना न्यूझीलंड आणि यूएई यांच्यात खेळवला गेला. १७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना किवींनी यूएईचा १० विकेट्सने दणदणीत पराभव केला. यासह, किवी संघाने या विश्वचषकात सलग दुसरा विजय नोंदवला. न्यूझीलंडचे सलामीवीर फिन एलन आणि टिम सेफर्ट यांनी पहिल्या विकेटसाठी १७५ धावांची भागीदारी केली. या भागीदारीसह, किवी संघाच्या सलामीच्या फलंदाजांनी मिळून एक नवा इतिहास घडवला आहे.
युएईने प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या गोलंदाजीविरूद्ध कमालीची फलंदाजी केली. युएईने १७२ धावांची धावसंख्या उभारली. या सामन्यात संघाचा कर्णधार मोहम्मद वसीमने अर्धशतकी खेळी साकारली. पण गोलंदाजीत मात्र युएईचा संघ चांगली कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे न्यूझीलंड संघाने सहज विजय मिळवला.
१७५ धावांची ही भागीदारी टी-२० विश्वचषकात कोणत्याही विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी आहे. यासह सेफर्ट आणि फिन एलन यांनी टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील मागील सर्व भागीदारी विक्रम मोडले. आतापर्यंत, टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात कोणत्याही विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम जोस बटलर आणि एलेक्स हेल्स यांच्या नावावर होता. २०२२ च्या टी-२० विश्वचषक उपांत्य सामन्यात भारताविरुद्ध या दोघांनी नाबाद १७० धावांची सलामी भागीदारी केली होती.
दक्षिण आफ्रिकेचे क्विंटन डी कॉक आणि रिली रुसो यादीत तिसऱ्या क्रमांकवर आहेत, ज्यांनी २०२२ च्या टी-२० विश्वचषकात बांगलादेशविरुद्ध १६८ धावांची भागीदारी केली होती. श्रीलंकेचा महेला जयवर्धने आणि कुमार संगकारा आता या यादीत चौथ्या क्रमांकावर गेले आहेत. २०१० च्या टी-२० विश्वचषकात वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी १६६ धावांची भागीदारी केली होती. २०२४ च्या टी-२० विश्वचषकात युगांडाविरुद्ध १५४ धावांची भागीदारी करणारे अफगाणिस्तानचे रहमानुल्लाह गुरबाज आणि इब्राहिम झाद्रान पाचव्या क्रमांकावर आहेत.
टी-२० विश्वचषकात सर्वात मोठी भागीदारी रचणारी जोडी
टीम सेफर्ट-फिन एलन – १७५* धावा वि. युएई, २०२६
जोस बटलर-एलेक्स हेल्स – १७० धावा वि. भारत, २०२२
क्विंटन डीकॉक-राईली रूसो – १६८ धावा वि. बांगलादेश
महेला जयवर्धने-कुमार संगकारा – १६६ धावा वि. वेस्ट इंडिज
रहमानुल्ला गुरबाज-इब्राहिम झादरान – १५४ धावा वि. युगांडा
