कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने वेस्ट इंडिज दौऱ्यात दिलेले सल्ले झिम्बाब्वेमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व सांभाळताना मोलाचे ठरले, असे भारताचा अव्वल फलंदाज विरोट कोहलीने सांगितले.
कॅरेबियन दौऱ्यात धोनीच्या मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे तीन एकदिवसीय सामन्यांत कोहलीने संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. ‘‘फारसे बोलणाऱ्यांपैकी धोनी नाही. तरीही मी त्याला खडतर परिस्थितीत सारखे प्रश्न विचारत असायचो. दडपणाच्या स्थितीत स्वत:ला शांत कसे ठेवायचे, हे मी धोनीला विचारायचो. संघाचे नेतृत्व सांभाळत असताना धोनीने दिलेले सल्ले खूपच फायद्याचे ठरले,’’ असे कोहलीने सांगितले.
भारताने झिम्बाब्वेवर ५-० असा विजय मिळवला. परदेशात पहिल्यांदा निर्भेळ यश मिळवण्याची करामत भारतीय संघाने केली. ‘‘धोनी सुट्टीसाठी अन्य ठिकाणी असल्यामुळे झिम्बाब्वेहून परतल्यावर त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. फोनवरून त्याला संदेश पाठवला आहे. धोनीने हा संदेश पाहिला की लगेचच तो मला फोन करेल, अशी आशा आहे,’’ असे कोहली म्हणाला.