मिश्र दुहेरी स्पर्धेची साऱ्यांनाच उत्सुकता
भारतातील सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या तळवळकर क्लासिकचा थरार मुंबईकरांना गुरुवारी अनुभवता येणार आहे. या स्पर्धेत देशातील अव्वल ३० शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग होणार असून गुरुवारी अंतिम फेरीत दहा शरीरसौष्ठपटूंमध्ये जेतेपद पटकावण्यासाठी चांगलीच चुरस रंगणार आहे. भारतामध्ये पहिल्यांदाच मिश्र जोडी स्पर्धा पाहता येणार असून याची उत्सुकता साऱ्यांनाच असेल.
गेल्या वेळी या स्पर्धेत नौदलाच्या मुरलीने बाजी मारली होती, पण यावेळी त्याला जगदिश लाड, विपीन पीटर, रॉबी मैतेई, बॉबी सिंग, सुनीत जाधव, मुकेश कुमार यांची चांगलीच स्पर्धा असेल. या स्पर्धेत एकूण १७ लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. ज्यामध्ये विजेत्याला पाच लाख, तर उपविजेत्याला तीन लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. त्याचबरोबर दहाव्या स्पर्धकालाही ३५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असून अंतिम फेरीत पोहोचू न शकलेल्या २० शरीरसौष्ठवपटूंनाही रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.
तळवळकर क्लासिकच्या निमित्ताने भारतामध्ये पहिल्यांदाज मिश्र जोडी स्पर्धा होणार असून यामध्ये बोरुन यमनम आणि ममता देवी ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील पती-पत्नी यांची जोडी सहभाग घेणार आहेत. त्याचबरोबर मुंबईची श्वेता राठोर-रायन कॅनल आणि अंकिता सिंग-यतिंदर सिंग यांनीही सहभाग घेतला आहे. या स्पर्धेत प्रत्येक जोडीला ९० सेकंदांचा अवधी देण्यात येणार असून यामध्ये ही जोडी एकत्रितपणे प्रदर्शन करणार आहेत.