आज भारत-न्यूझीलंड लढतीत प्रतिष्ठा पणाला

विराट कोहलीच्या कर्णधारपदाच्या कारकीर्दीतील ही सर्वात आव्हानात्मक कसोटी आहे. राखेतून भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे कामगिरी केल्यास ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारतीय संघाचे आव्हान तरू शकेल. त्यामुळेच रविवारी, ३१ ऑक्टोबरला होणाऱ्या भारत-न्यूझीलंड यांच्यातील ‘अव्वल-१२’ फेरीच्या लढतीला उपांत्यपूर्व सामन्याचे महत्त्व प्राप्त झाले आहे.

गेल्या रविवारी भारताने पाकिस्तानकडून मानहानीकारक पराभव पत्करला. यातून सावरत भारताला ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील बलाढ्य मानल्या जाणाऱ्या आणि दर्जेदार खेळाडूंचा भरणा असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीसाठी सज्ज व्हावे लागणार आहे. पाकिस्तानकडून पराभवामुळे न्यूझीलंडच्या अभियानालाही खराब सुरुवात झाली आहे. रात्रीच्या सामन्यांच्या निकालात दव हा घटक महत्त्वाचा ठरत असल्यामुळे नाणेफेकीचा कौल निर्णायक ठरतो. त्यामुळे कोहलीला प्रथम नाणेफेकीचा कौल अनुकूल ठरण्याची अपेक्षा आहे.

तुलनेने सोप्या गट-२ मध्ये पाकिस्तानने तिन्ही महत्त्वाचे सामने जिंकत सहा गुणांसह बाद फेरीमधील स्थान आठवड्याभरातच जवळपास निश्चित केले आहे.

हार्दिकच्या कामगिरीकडे लक्ष

पाकिस्तानविरुद्ध सलामीवीर रोहित शर्मा (०) आणि के. एल. राहुल (३) तसेच चौथ्या क्रमांकावरील सूर्यकुमार यादव (११) अपयशी ठरले. विराट आणि ऋषभ पंतने धडाकेबाज फलंदाजी केली. मात्र गेले दीड वर्ष पाठीच्या दुखापतीने पछाडलेला सहाव्या क्रमांकावरील फलंदाज हार्दिक पंड्याच्या अपयशाबाबत चर्चा ऐरणीवर होती. न्यूझीलंडविरुद्ध हार्दिकला संघात कायम ठेवले जाणार असले तरी त्याला कारकीर्द वाचवण्यासाठी स्वत:ला सिद्ध करावे लागणार आहे.

गोलंदाजीत सुधारणेची गरज

तीन वेगवान आणि दोन फिरकी अशा पाच गोलंदाजांचे भारताचे समीकरण पाकिस्तानविरुद्ध पूर्णत: फसले. जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांच्या वेगवान माऱ्याची पाकिस्तानच्या सलामीवीरांनी लय बिघडवून टाकली. अनुभवी रवींद्र जडेजा आणि नवख्या वरुण चक्रवर्तीच्या फिरकीलाही त्यांनी चोप दिला. त्यामुळे सहाव्या गोलंदाजाची भारताला तीव्र उणीव जाणवली. फलंदाजीत अपयशी ठरलेला हार्दिक गोलंदाजीही करू शकत नसेल, तर त्याला संघात का घ्यावे, हा सवाल माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्यासह अनेकांनी उपस्थित केला आहे.

विल्यम्सन-गप्टिलच्या दुखापतीची चिंता

कर्णधार केन विल्यम्सनची तंदुरुस्ती आणि मार्टिन गप्टिलची पायाची दुखापत न्यूझीलंडच्या फलंदाजीसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. त्यामुळे मधल्या फळीतील फलंदाज डेव्हॉन कॉन्वे आणि सलामीवीर डॅरेल मिचेल यांच्यावर न्यूझीलंडची मदार आहे. या दोघांनी पाकिस्तानविरुद्ध प्रत्येकी २७ धावा काढल्या होत्या.

बोल्ट-साऊदीवर भिस्त

पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत शाहीन आफ्रिदीने भारताच्या आघाडीच्या फळीला नेस्तनाबूत केले होते. न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट हाच कित्ता गिरवण्याची शक्यता आहे. त्याच्या साथीला टिम साऊदीसारखा कणखर वेगवान गोलंदाज आहे. त्यामुळे भारताच्या नामांकित फलंदाजांचा कस लागणार आहे. अमिरातीच्या खेळपट्टीवर राज्य करू शकणारे मिचेल सँटनर आणि ईश सोधी हे फिरकी गोलंदाजही न्यूझीलंडकडे आहेत.

६-८

भारत-न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत १६ ट्वेन्टी-२० सामने आहेत. यापैकी भारताने ६ आणि न्यूझीलंडने ८ सामने जिंकले आहेत, तर दोन सामने बरोबरीत (टाय) सुटले आहेत.