८६ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत अमेरिकेच्या डेव्हिड मॉरिसकडून पराभूत झालेल्या दीपक पुनियाचा टोक्यो ऑलिम्पिकमधील कांस्यपदकाच्या सामन्यातही पराभव झालाय. मायलीस अ‍ॅमिनेला त्याने त्याला ३-२ ने पराभूत केलं आहे. विशेष म्हणजे शेवटच्या १० सेकंदामध्ये दीपक पुनियाचा पराभव झाला.

पहिल्या तीन मिनिटांनंतर स्कोअरकार्ड २-१ असं होतं. मात्र सामन्यातील शेवटच्या तीन मिनिटांमध्ये दीपकने आक्रमक पद्धतीने खेळून गुण मिळवण्याऐवजी बचावात्मक पवित्रा स्वीकारला आणि तिथेच त्याला फटका बसला. सामन्यातील अगदी २० सेकंद उरलेलं असताना मायलीसने त्याचा पाय पकडला आणि १० सेकंदांहून कमी वेळ शिल्लक असताना मायलीसने पुनियाविरोधात दोन गुण पटकावले. त्यामुळेच आधीचा एक गुण आणि हे दोन गुण असे एकूण ३ गुण मिळाल्याने मायलीस विजेता ठरला. सामन्याच्या शेवटच्या काही सेकंदांमध्ये मिळालेल्या या गुणांसंदर्भात पुनियाने चॅलेंज केलं. मात्र सर्व पंचांनी पुन्हा एकदा व्हिडीओ पाहून आपला दोन गुण देण्याचा निर्णय कायम ठेवला.

मायलीस हा सॅन मॅरिनो या छोट्याश्या देशाचं प्रतिनिधित्व करतो. सॅन मॅरिनोचं हे ऑलिम्पिकमधील तिसरं पदक ठरलं. हा युरोपमधील सर्वात छोट्या देशांपैकी एक आहे. हा देश पूर्णपणे इटलीने वेढलेला आहे. या देशाचे क्षेत्रफळ ६१.२ स्वेअर किलोमीटर इतके आहे. या देशाची लोकसंख्या अवघी ३३ हजार ६०० इतकी आहे.

रवी कुमारला रौप्यपदक

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये एक रौप्य आणि तीन कांस्यपदके जिंकणाऱ्या भारताला सुवर्णपदकाचे वेध लागले होते. कुस्तीमध्ये ५७ किलो वजनी गटात रवी कुमार दहियाचा अंतिम सामना रशियन ऑलिंपिक कमिटीच्या जावूर युगुयेवशी झाला, पण युगुयेवने आपला अनुभव पणाला लावत ही लढत ७-४ ने जिंकली. रवीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले असून भारताच्या खात्यात अजून एका पदकाची नोंद झाली आहे. रवीने उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या सनायेव नुरिस्लामचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. रवीला हा विजय फॉल रूलद्वारे मिळाला. म्हणजे त्याने नूरिस्लामला सामन्यातूनच बाहेर फेकले होते.

भारताकडे कुस्तीमधील सहा पदके

कुस्तीपटू सुशील कुमारने भारताला ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदके जिंकून दिली होती. सुशीलने २००८च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक आणि २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले. रवीच्या आधी भारताने कुस्तीमध्ये ५ पदके जिंकली आहेत. सुशीलव्यतिरिक्त योगेश्वर दत्तने २०१२मध्ये कांस्य, २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकने कांस्य जिंकले. खाशाबा जाधव ऑलिम्पिक कुस्तीमध्ये पदक जिंकणारे भारताचे पहिला कुस्तीपटू होते. १९५२च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी ही कामगिरी केली.