उपांत्य फेरीमधील निराशाजनक पराभव मागे टाकून ४१ वर्षांचा ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवण्याचा पराक्रम भारतीय पुरुष संघाने केलाय. भारताने कांस्यपदकाच्या लढतीमध्ये बलाढय़ जर्मनीला पराभूत केलं. आठ ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकणाऱ्या भारताने १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये अखेरचे पदक जिंकले होते. परंतु बेल्जियमविरुद्धच्या चुका टाळून रिओ ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या जर्मनीला टक्कर देत भारताने पदकाचे स्वप्न ४१ वर्षांनंतर साकारले. अत्यंत रोमहर्षक सामन्यामध्ये भारताने अगदी शेवटच्या सेकंदाला विजयावर शिक्कामोर्तब केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झालं असं की, सामना अगदी शेवटच्या मिनिटामध्ये पोहचला तेव्हा जर्मनी भारताकडे असलेली एक गोलची आघाडी मोडून काढण्यासाठी प्रयत्न करत होता. गोलकीपरशिवाय खेळणाऱ्या जर्मनीला सामन्यातील आपलं आव्हान टिकवून ठेवण्यासाठी आणि अतिरिक्त वेळ किंवा पेनल्टी शूट आऊटपर्यंत सामना नेण्यासाठी सामनाबरोबरीत सोडवणं आवश्यक होतं. याच प्रयत्नात असतानाच अगदी सामन्यातील शेवटचे सहा सेकंद शिल्लक होते तेव्हा जर्मनीला पेनल्टी कॉर्नर मिळाला. ही जर्मनीची शेवटची संधी होती. कारण हा गोल झाल्यास सामना बरोबरीत सुटणार होता तर दुसरीकडे भारताने हा गोल वाचवल्यास ४१ वर्षांनी पदकावर नाव कोरणार होता. पंचांनी शिट्टी वाजवताच जर्मनीने गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय गोलपोस्टजवळ भिंत बनून उभ्या असणाऱ्या गोलपकीपरने म्हणजेच श्रीजेशने हा प्रयत्न हाणून पाडला आणि भारतीय खेळाडूंनी मैदानात एकच जल्लोष केला. हा गोल झाला असता तर सामना अतिरिक्त वेळेत गेला असता आणि तिथेही गोल झाला नसता तर पेनल्टी शूट आऊटने विजेता निश्चित करण्यात आला असता. मात्र भारतीय संघाने आपला संयम कायम राखत सामना ५-४ च्या फरकाने जिंकला.

रुपिंदर पाल सिंग, हरमनप्रीत सिंग, वरुण कुमार आणि अमित रोहित यांच्यासारखे जगातील चार सर्वोत्तम ड्रॅग-फ्लिकर संघात असतानाही पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करण्यात भारताची कामगिरी समाधानकारक राहिली नाही. तरी भारताने सांघिक खेळाच्या जोरावर तब्बल ४१ वर्षांनी कांस्यपदकावर नाव कोरलं आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tokyo 2020 hockey india won bronze in last 6 seconds scsg
First published on: 05-08-2021 at 09:13 IST