भारताची युवा बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहेनने कारकीर्दीतील पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरी गाठण्याची किमया साधली. आज शुक्रवारी महिलांच्या ६९ किलो वजनी गटातील रोमहर्षक उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत लव्हलिनाने चायनीज तैपईची माजी जगज्जेती निन-चीनवर मात केली. या विजयासह तिने भारताचे पदक निश्चित केले आहे.

मोहम्मद अलींमुळे बदलले लव्हलिनाचे आयुष्य

भारताची दुसरी मेरी कोम अशी ओळख होत चाललेल्या लव्हलिनाचा प्रवास संघर्षमय आहे. एकदा लव्हलिनाचे वडील एका वृत्तपत्रामध्ये गुंडाळून मिठाई घरी घेऊन आले. ही मिठाई ज्या वृत्तपत्रामध्ये गुंडाळली होती, त्यावर बॉक्सिंगपटू मोहम्मद अली यांचा एक फोटो होता. हा फोटो पाहून लव्हलिनाने तिच्या वडीलांकडे या खेळाबद्दल चौकशी केली. लव्हलिनाच्या वडीलांनी तिला मोहम्मद अली यांच्या संघर्षमय प्रवसाची कथा सांगितली. त्यानंतर लव्हलिनाचे संपूर्ण आयुष्यच बदलले. लव्हलिनाने मोहम्मद अली यांच्याकडून प्रेरणा घेऊन किक बॉक्सिंगऐवजी बॉक्सिंगमध्ये करियर करण्याचा निर्णय घेतला.

लव्हलिनाची बॉक्सिंगमधील प्रतिभा सर्वप्रथम राष्ट्रीय कोच पोडम बोरो यांनी तिच्या शाळेत क्रीडा प्राधिकरणाद्वारे घेतलेल्या चाचणी दरम्यान लक्षात आली. २०१२ मध्ये लव्हलिना बॉक्सिंग अ‍ॅकॅडमीमध्ये दाखल झाली आणि पोडम बोरो यांच्या देखरेखीखाली तिने प्रशिक्षण सुरू केले. ५ वर्षांनंतर तिने आशियाई स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. येथून तिची कारकीर्द बदलली आणि तिने एक एक करत यशाच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली.

हेही वाचा – सिंधूकडून शिकण्यासारखं: करोना काळाचा सिंधूनं उपयोग केला ऑलिम्पिकच्या तयारीसाठी

२०१८मध्ये, तिने नवी दिल्ली येथे आयोजित इंडिया ओपन आंतरराष्ट्रीय बॉक्सिंगमध्ये पहिले आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक जिंकले. या कामगिरीमुळे तिला राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडले गेले. त्याच वर्षी, मंगोलियातील उलानबातार कपमध्ये तिने रौप्यपदक, त्यानंतर सिलेसियन चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक जिंकून आपली क्षमता सिद्ध केली. ६९ किलो वेल्टरवेट प्रकारात तिने दोन्ही पदके जिंकली.

ऑलिम्पिकपूर्वी लव्हलिनाच्या आईवर झाली होती शस्त्रक्रिया

टोक्यो ऑलिम्पिकपूर्वीचे काही महिने लव्हलिनासाठी खूप कठीण होते. प्रत्येक खेळाडू त्याच्या प्रशिक्षणात व्यस्त होता. परंतु लव्हलिनाला तिच्या आईचे मूत्रपिंड प्रत्यारोपण करावे लागले. त्यामुळे लव्हलिनाला बराच काळ बॉक्सिंगपासून दूर राहावे लागले. आईच्या शस्त्रक्रियेनंतर ती पुन्हा रिंगमध्ये परतली. परंतु करोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे त्याच्या प्रशिक्षणावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. कोचिंग स्टाफच्या सदस्यांना संसर्ग झाल्याने तिला एकट्याने सराव करावा लागला. तिने व्हिडिओ कॉलद्वारे प्रशिक्षण घेतले. सर्व अडथळे पार करून टोक्योला गेली.