स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक २०२०मध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. त्याने शनिवारी आपल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत ८७.५८ मीटर भाला फेकून देशाला ट्रॅक आणि फील्ड अॅथलेटिक्समध्ये पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून दिले. त्याने आपले सुवर्णपदक ‘फ्लाइंग सिख’ म्हणून ओळखले जाणारे दिवंगत धावपटू मिल्खा सिंग यांना समर्पित केले. मिल्खा यांचे नुकतेच करोनामुळे निधन झाले.

‘आर्मी मॅन’ नीरज चोप्राने भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकून भारताला आनंद साजरा करण्याची संधी दिली. सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्याने तिरंग्यासह मैदानाभोवती फिरून आनंदोत्सव साजरा केला. टोक्यो ऑलिम्पिकमधील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आणि वैयक्तिक स्पर्धेत दुसरे सुवर्णपदक आहे. नीरजच्या आधी अनुभवी नेमबाज अभिनव बिंद्राने २००८च्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

हेही वाचा – #NeerajChopra : You Tube वरून घेतलं प्रशिक्षण, आता ठरलाय देशाचा ‘गोल्डन बॉय’!

पदक जिंकल्यानंतर नीरज म्हणाला, ”मी माझे हे सुवर्णपदक महान मिल्खा सिंग यांना समर्पित करतो. कदाचित ते मला स्वर्गातून बघत असतील. मी कधीच सुवर्णपदक जिंकण्याचा विचार केला नव्हता, पण काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती. मला माहीत होते, की आज मी माझे सर्वोत्तम काम करेन. मला ऑलिम्पिक स्पर्धेचा विक्रम मोडायचा होता.”

तो पुढे म्हणाला, ”मला पदकासह मिल्खा सिंग यांना भेटायचे होते. त्यांनी हे पदक पीटी उषा आणि त्या खेळाडूंना समर्पित केले जे ऑलिम्पिक पदके जिंकण्याच्या जवळ पोहोचले होते, परंतु यशस्वी होऊ शकले नाहीत. जेव्हा राष्ट्रगीत सुरू होते आणि भारतीय तिरंगा वर जात होता, तेव्हा मी रडणार होतो.”

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारत

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत भारताला पदक मिळवून देणाऱ्यांमध्ये रौप्य (मीराबाई चानू), कांस्य (पीव्ही सिंधू), कांस्य (लव्हलिना बोर्गोहेन), कांस्य (भारतीय पुरुष हॉकी संघ), रौप्य (रविकुमार दहिया), कांस्य (पुनिया) आणि सुवर्ण (नीरज चोप्रा) यांचा समावेश आहे. टोक्यो ऑलिम्पिकच्या १८ स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू सहभागी झाले होते. भारताकडून यावेळी १२६ स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतलेला आहे.