Tokyo 2020 Olympics: “आम्हाला दोघांनाही सुवर्णपदक मिळू शकतं का?” या प्रश्नावर अधिकारी “हो म्हणाले अन्…

एका खेळासाठी दोघांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आलं. विशेष म्हणजे हा संघिक खेळ नव्हता आणि दोघेही वेगवेगळ्या देशांचे आहेत. त्यातही खास गोष्ट म्हणजे दोघेही मित्र आहेत.

Tokyo 2020 Olympics Athletics Can we have two golds Barshim Tamberi share high jump win
दोघांनाही सुवर्णपदक देण्यात आलं (फोटो सौजन्य : रॉयटर्सवरुन साभार)

ऑलिम्पिक असो किंवा इतर कोणतीही मोठी स्पर्धा असो त्यामध्ये एका खेळासाठी एकच सुर्वणपदक दिलं जातं. मात्र टोक्यो ऑलिम्पिकमध्ये एक वेगळच चित्र रविवारी पहायाला मिळालं. एका खेळासाठी दोन खेळाडूंना सुवर्णपदक प्रदान करण्यात आलं. विशेष म्हणजे हा संघिक खेळ नव्हता आणि दोन्ही खेळाडू वेगवेगळ्या देशांचे आहेत, मात्र त्याचवेळी ते एकमेकांचे चांगले मित्रही आहेत. २३ जुलै ते ८ ऑगस्टदरम्यान चालणाऱ्या ऑलिम्पिक खेळांमध्ये २०० हून अधिक देशांचे ११ हजारहून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. तिसऱ्यांना जपानमध्ये ऑलिम्पिकचं आयोजन केलं जात असून रविवारी या ठिकाणी घडलेला प्रकार हा सर्वांनाच आश्चर्यात टाकणारा ठरला.

नक्की पाहा हे फोटो >> वडिलांनी मिठाई गुंडाळून आणलेल्या पेपरने तिचं आयुष्य बदललं; भारतासाठी मेडल निश्चित करणाऱ्या लव्हलिनाचा प्रेरणादायी प्रवास

रविवारी सायंकाळी ऑलिम्पिकमधील उंच उडी प्रकाराचे अंतिम सामने पार पडले. यामध्ये कतारचा मुताज बर्सहिम, इटलीचा गनमार्को तेम्बेरी आणि बेलारुसच्या माकसिम या तिघांनी २.३७ मीटर उंच उडी मारली. मात्र तिघांनाही २.३९ च्या विक्रमापर्यंत पोहचता आलं नाही. मात्र दोन प्रयत्नांमध्ये माकसिमला योग्य पद्धतीने उडी मारता आली नाही. त्यामुळे तो तिसऱ्या स्थानी सरकला आणि त्याला कांस्यपदक देण्यात आलं. मात्र मुताज बर्सहिम आणि इटलीचा गनमार्को तेम्बेरी यांच्यामध्ये अंतिम सामना होणार होता. दोघांनीही २.३७ मीटरची उडी मारली. त्यानंतर पंचांनी त्यांना आणखीन तीन संधी दिल्या. त्यावेळी त्यांनी प्रयत्न करुनही त्यांना २.३७ पेक्षा लांब उडी मारता आली नाही.

त्यानंतर त्यांना चौथ्यांदा प्रयत्न करण्यास सांगण्यात आलं. मात्र तेव्हा तेम्बेरीने दुखापत झाल्याने माघार घेण्याचं ठरवलं. तेव्हा मुताजने स्वत: एकट्याने उडी मारुन सुवर्णपदकावर नाव कोरण्याची संधी न घेता पंचांशी चर्चा केली. “मी शेवटची संधी न घेता माघार घेतली तर आम्हा दोघांना सुवर्णपदक संयुक्तरित्या दिलं जाईल का?,” असं मुताजने विचारलं. त्यावर पंचांनी, “होय तुम्हाला संयुक्त विजेता घोषित केलं जाईल,” असं सांगितलं आणि मुताजने पुढच्या क्षणाला नाव मागे घेत सुवर्णपदक दुखापतग्रस्त तेम्बेरीसोबत शेअर केलं. हे पाहून तेम्बरीने धावत येऊन मुताजला मिठी मारली आणि खेळाच्या मैदानात मैत्रीचा एक अनोखा अध्याय लिहिला गेला तो ही फ्रेण्डशीप डेच्या दिवशी.

नक्की पाहा हे फोटो >> ९७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच देशाला पहिलं गोल्ड मेडल मिळवून दिलं; ५ कोटी रुपये, घर भेट म्हणून मिळालं

गनमार्को तेम्बेरी हा ऑलिम्पिकमध्ये उंच उंडीमध्ये सुवर्णपदक जिंकणारा केवळ दुसरा खेळाडू ठरलाय. यापूर्वी १९८० मध्ये मॉस्को ऑलिम्पिकमध्ये सारा समोनी या महिलेने उंच उडीमध्ये इटलीसाठी सुवर्णपदक जिंकलं होतं. “दुखापतीमधून नुकताच सावरल्याने चांगला खेळ करण्यावरच माझा अधिक भर होता. आता माझ्याकडे सुवर्णपदक आहे. हा अविस्मरणीय क्षण आहे,” असं मत गनमार्को तेम्बेरीने व्यक्त केलं. २०१७ मध्येच गनमार्को तेम्बेरी कदाचित मी पुन्हा कधीच मैदानात उतरणार नाही असं म्हटलं होतं. तेव्हापासून या सुवर्णपदकापर्यंतचा गनमार्को तेम्बेरीचा प्रवास फारच रंजक राहिला आहे.

जुलै २०१८ मध्ये हंगेरीमध्ये विश्वविक्रम करण्याच्या नादात गनमार्को तेम्बेरीने आपल्या गुडघ्याला गंभीर दुखापत करुन घेतील होती. त्यानंतर जवळजवळ ११ महिने तो मैदानातच उतरला नाही. २०१६ मध्ये रिओ ऑलिम्पिकच्या आधीही गनमार्को तेम्बेरीला दुखापत झालेली. अशा परिस्थितीत आता गनमार्को तेम्बेरी कधीच मैदानात परतणार नाही असं म्हटलं जात होतं. मात्र गनमार्को तेम्बेरीने दमदार पुनरागमन करत थेट सुवर्णपदावर आपलं नाव कोरलं. हे गनमार्को तेम्बेरीचं सलग तिसरं ऑलिम्पिक पदक आहे. यापूर्वी त्याने २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक तर २०१६ मध्ये रियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकलं होतं.

आता अशापद्धतीने दोन सुवर्णपदकं देणं योग्य आहे का?, ते कोणत्या नियमांअंतर्गत देण्यात आलं असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र अशापद्धतीने दोघांना सुवर्णपदक देण्याची तरतूद नियमांमध्ये आहे. कोणत्याही स्पर्धेमध्ये तीन पदकं दिली जातात. या स्पर्धेतही तीनच पदकं देण्यात आली. त्यामध्ये दोन सुवर्ण तर एका कांस्य पदकाचा समावेश होता. विशेष परिस्थितीमध्ये अशाप्रकारे दोघांना एकच पदक देण्याची तरतूद ऑलिम्पिक समितीकडून करण्यात आलेली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tokyo 2020 olympics athletics can we have two golds barshim tamberi share high jump win scsg

ताज्या बातम्या