जपानची राजधानी टोक्यो येथे ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पण टोक्यो ऑलिम्पिकमध्ये करोना विषाणूचा धोका वाढत आहे. शुक्रवारी, टोक्यो ऑलिम्पिकशी संबंधित १९ जणांना करोना विषाणूची लागण झाली आहे. यासह, टोक्यो ऑलिम्पिकमध्ये करोना रुग्णांची संख्या १०० च्या वर गेली आहे. चेक प्रजासत्ताकचा चौथा खेळाडू रोड सायकल चालक मिशेल श्लेगल हा करोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.

करोनामुळे ऑलिम्पिक स्पर्धेबाबत आयोजकांनी अतिशय कठोर निर्णय घेतले आहेत. ऑलिम्पिक खेळ मैदानावर प्रेक्षकांशिवाय होत आहेत. इतकेच नाही तर साथीच्या रोगामुळे उद्घाटन सोहळ्यात १००० पेक्षा कमी लोक असतील आणि प्रेक्षकांना परवानगी दिली गेली नाही.

टोक्यो ऑलिम्पिकच्या आयोजकांनी जाहीर केलेल्या आकडेवारीत तीन खेळाडू, दहा क्रीडा कर्मचारी, तीन पत्रकार आणि तीन कंत्राटदार करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. करोनाची बाधितांची संख्या आता १०६ पर्यंत पोहचली आहे. ज्यात ११ खेळाडूंचा समावेश आहे.

यापुर्वी चेक प्रजासत्ताकचा व्हॉलीबॉलपटू आँद्रेज पेरूसिच याला करोनाची लागण झाली होती.

हेही वाचा- ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यातून स्त्री-पुरुष समानतेचा संदेश

अमेरिकेच्या जिम्नॅस्टिक्सपटूलाही करोना

अमेरिकेच्या महिला जिम्नॅस्टिक्सपटूला करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. अमेरिकन जिम्नॅस्टिक्स संघातील खेळाडू एकमेकांच्या संपर्कात असल्याने या खेळाडूचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. आता या खेळाडूच्या जागी कारा इकेर आणि लीन वाँग या पर्यायी खेळाडूंपैकी एकाला संधी मिळणार आहे. ‘‘खेळाडू, प्रशिक्षक आणि साहाय्यक कर्मचाऱ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. कलात्मक जिम्नॅस्टिक्स संघातील खेळाडूला करोनाची लागण झाल्याने तिला विलगीकरणात दाखल करण्यात आले आहे. मात्र या क्षणी आम्ही कोणतीही माहिती उघड करणार नाही,’’ असे अमेरिका ऑलिम्पिक महासंघाच्या पत्रकात म्हटले आहे.

करोना झाल्याने गॉफ ऑलिम्पिकला मुकणार

अमेरिकेची टेनिसपटू कोको गॉफ हिला करोनाची लागण झाल्याने टोक्यो ऑलिम्पिकमधून माघार घ्यावी लागली आहे. ‘‘मला करोनाची बाधा झाली, ही बातमी सांगताना दु:ख होत आहे. त्यामुळे मी ऑलिम्पिकमध्ये खेळू शकणार नाही. ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणे हे माझे स्वप्न होते. आता भविष्यात हे स्वप्न साकार करण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा बाळगते,’’ असे जागतिक क्रमवारीत २५व्या स्थानी असलेल्या गॉफने सांगितले. ‘‘या कठीण काळातून लवकरात लवकर बरे होण्याचे बळ तिला मिळो, याच शुभेच्छा. लवकरच ती पुन्हा पुनरागमन करेल, अशी अपेक्षा आहे,’’ असे अमेरिका टेनिस संघटनेकडून सांगण्यात आले.

दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा ऑलिम्पिक दौरा रद्द

दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यासाठी जपानच्या पंतप्रधानांसोबत सुरू असलेली बोलणी फिस्कटल्यामुळे दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-इन यांनी टोक्यो ऑलिम्पिकसाठी जपानला न जाण्याचे ठरवले आहे. ‘‘युद्धकाळातील परिस्थिती आणि भविष्यात दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यासाठी सेऊल आणि टोक्योमधील पदाधिकाऱ्यांशी बोलणी सुरू होती; पण दोन्ही देशांतील नेत्यांमध्ये समान तोडगा निघू शकला नाही,’’ असे मून यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. मून हे ऑलिम्पिकच्या उद्घाटनाला उपस्थित राहून जपानचे पंतप्रधान योशिहिडे सुगा यांच्याशी युद्धानंतर इतिहासावरून सुरू असलेला वाद, व्यापार तसेच सैन्याच्या सहकार्याबद्दल चर्चा करणार होते.