टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला बॉक्सर मेरी कॉम हिच्याकडून पदकाची अपेक्षा आहे. अपेक्षेनुसार मेरी कोमने स्पर्धेतील सुरुवात विजयी पंचने केली आहे. ६ वेळा विश्व चॅम्पियन असलेल्या ‘सुपर मॉम’ मेरी कोमने डोमिनिकाच्या मिगुएलिना हर्नांडेज हिला पराभूत केलं.  मेरीकोमने हर्नांडिज हिला ४-१ ने पराभूत करत अंतिम १६ मध्ये प्रवेश केला आहे. मेरी कोमचा पुढचा सामना २९ जुलैला असणार आहे. कोलंबियाच्या तिसऱ्या मानांकित वालेंसिया विक्टोरियाशी तिची लढत असणार आहे. मेरी कोमने ५१ किलो वजनी गटात भाग घेतला आहे.

मणिपूरची ३८ वर्षीय मेरी कोम टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेच्या ओपनिंग सेरेमनीत भारतीय दलाची ध्वजवाहक होती. मार्च २०२० आशिया/ओसनिया क्वालिफायरच्या उपांत्य फेरीत पोहोचल्यानंतर टोक्यो ऑलिम्पिकचं तिकीट पक्कं केलं होतं. मेरी कोमची शेवटची ऑलिम्पिक स्पर्धा असणार आहे. यापूर्वी लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत मेरी कॉमने कांस्य पदक पटकावलं होतं.

मेरी कोमचा २००३ मध्ये अर्जुन पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. २००६ मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता. तसेच २९ जून २००९ साली भारतीय खेळातील सर्वोच्च पुरस्कार राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने तिचा सन्मान करण्यात आला होता.