टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या गुरुवारी सहाव्या दिवशी पदकांच्या दृष्टीने भारताच्या काही आशा कायम आहेत. भारताच्या पुरुष हॉकी संघासह

बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि बॉक्सिंगपटू सतीश कुमार यांनी उपांत्यपूर्व फेरीत वाटचाल केली. याप्रमाणे तिरंदाजीत अतानू दासने उपउपांत्यपूर्व फेरी गाठून आणि नेमबाज मनू भाकरने पहिल्या पात्रता टप्प्यात पाचवा क्रमांक मिळवत दिलासा दिला. परंतु लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या ३८ वर्षीय एमसी मेरी कोमचे आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आल्यानंतर पंचगिरीवर टीका केली.

सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक

टोक्यो : विश्वविजेत्या पी. व्ही. सिंधूने ऑलिम्पिक महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली आहे. गुरुवारी तिने डेन्मार्कच्या मिया ब्लिक्फेल्डचा पराभव केला.

रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवणाऱ्या भारताच्या २६ वर्षीय सिंधूने १३व्या मानांकित मियाला ४१ मिनिटांत २१-१५, २१-१३ असे पराभूत केले. सिंधूपुढे उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अकाने यामागुची हिचे कडवे आव्हान असेल. यामागुचीने उपउपांत्यपूर्व सामन्यात कोरियाच्या किम गॅऊनवर २१-१७, २१-१८ अशी मात केली. भारताच्या सहाव्या मानांकित सिंधूने जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या यामागुचीविरुद्ध ११-७ अशी सरस कामगिरी आहे. या दोघी मार्चमध्ये झालेल्या ऑल इंग्लंड अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत अखेरच्या एकमेकांशी लढल्या होत्या. तो सामनासुद्धा सिंधूने जिंकला होता.

मियाने २-० अशा आघाडीसह सामन्याला प्रारंभ केला. परंतु सिंधूने त्वरित सामन्यावर नियंत्रण मिळवताना ६-४ अशी आघाडी घेतली. नंतर पहिल्या विश्रांतीप्रसंगी ११-६ अशी आघाडी घेतली. त्यानंतर मियाने उत्तम प्रतिकार करीत अंतर १४-१६ असे कमी केले. पण असंख्य न टाळण्याजोग्या चुकांमुळे मियाने पहिला गेम गमावला.

दुसऱ्या गेममध्ये सिंधूने वेगवान खेळ करीत ५-० अशी आघाडी घेतली. विश्रांतीनंतर सिंधूने काही गुण गमावले. परंतु अल्पावधीत सामन्यावर नियंत्रण मिळवत गेमसह सामनाही खिशात घातला. बी. साईप्रणीत ऑलिम्पिक पदार्पणात अपयशी ठरल्यानंतर फक्त सिंधूवर भारतीय बॅडमिंटनच्या आशा  टिकून आहेत.

पहिल्या गेममध्ये मी उत्तम सुरुवात केली. परंतु १६-१५ असा फरक असताना मी बचावावर भर दिला. माझ्या प्रशिक्षकांनी मी चुकीच्या पद्धतीने खेळत असल्याची मला जाणीव करून दिली. मी त्वरित रणनीती आणि खेळात सुधारणा करीत पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये मी आत्मविश्वासाने खेळत आघाडी घेत सामनाही जिंकला. – पी. व्ही. सिंधू

 

भारतीय हॉकी संघाची अर्जेंटिनावर मात

टोक्यो : भारतीय पुरुष हॉकी संघाने गुरुवारी गतविजेत्या अर्जेंटिनावर ३-१ असा वर्चस्वपूर्ण विजय मिळवत ऑलिम्पिक हॉकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के केले. भारतीय संघाने अखेरच्या तीन मिनिटांत दोन गोल केले.

पहिली दोन सत्रे गोलशून्य स्थिती संपल्यानंतर ४३व्या मिनिटाला वरुण कुमारने भारताचे खाते उघडले. मग स्कूथ कॅसिया याने पेनल्टी कॉर्नरच्या बळावर ४८व्या मिनिटाला गोल करीत अर्जेंटिनाला बरोबरी साधून दिली आणि सामन्यातील चुरस वाढवली. त्यानंतर उत्तरार्धात सागर प्रसाद आणि हरमनप्रीत सिंग यांनी अनुक्रमे ५८व्या आणि ५९व्या मिनिटाला गोल करीत भारताचा विजय निश्चित केला.

अ-गटात दुसऱ्या स्थानावर असलेल्या भारताचा हा तिसरा विजय ठरला. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करला होता. अर्जेंटिनाचा संघ पाचव्या क्रमांकावर झगडत असून, भारताची अखेरची साखळी लढत शुक्रवारी जपानशी आहे.

भारतीय संघाने आक्रमक सुरुवात करीत अर्जेंटिनाच्या बचावावर दडपण ठेवले. मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारताच्या मध्यरक्षणाने मध्यांतरापर्यंत अप्रतिम खेळ केला. परंतु दोन्ही संघांना पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतरण करण्यात अपयश आले. तिसऱ्या सत्रातही भारताकडून गुर्जंत सिंग आणि रुपिंदर पाल सिंग यांनी काही संधी वाया घालवल्या. अखेरीस ४३व्या मिनिटाला वरुणने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांत करीत पहिला गोल साकारला. तिसऱ्या सत्राच्या उत्तरार्धात भारताने चार सलग पेनल्टी कॉर्नर वाया घालवले. अर्जेंटिनाच्या गोलरक्षकाने उत्तम बचाव केला. ४८व्या मिनिटाला कॅसियाने अर्जेंटिनाचा पहिला गोल पेनल्टी कॉर्नरद्वारे नोंदवला.

भारतीय महिलांना विजय अनिवार्य

टोक्यो : सलग तीन सामन्यांत पराभव पत्करणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाला शुक्रवारी आयर्लंडविरुद्ध विजय मिळवणे अनिवार्य असेल. राणी रामपालच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताने ही लढतसुद्धा गमावल्यास त्यांच्या उपांत्यपूर्व फेरी गाठण्याच्या आशा उद्ध्वस्त होतील. ‘अ’ गटात पाचव्या स्थानी असलेल्या भारताने आतापर्यंत नेदरलँड्स, जर्मनी, ग्रेट ब्रिटन यांच्याविरुद्ध पराभव पत्करला. त्यामुळे आयर्लंडला नमवल्यानंतर भारताला शनिवारी दक्षिण आफ्रिकेलासुद्धा धूळ चारावी लागणार आहे.

गोलफरक जरी ३-१ असा भारताच्या बाजूने असला तरी सामना सोपा नव्हता. भारतीय संघाने उत्तम कामगिरी बजावली. अर्जेंटिनासारख्या संघाविरुद्धच्या सामन्यात हे अपेक्षितच होते. आपण पुन्हा अनेक संधी वाया घालवल्या, अनेक निर्माणही केल्या. पण निराश न होता, अखेरपर्यंत संयमाने लढत दिली, याचे मला समाधान वाटते. – ग्रॅहम रीड, भारताचे मुख्य प्रशिक्षक

सतीशची पदार्पणात लक्षवेधी कामगिरी

टोक्यो : भारताच्या सतीश कुमारने कारकीर्दीतील पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली आहे. पुरुषांच्या ९१ किलो वजनी गटात सतीशने जमैकाच्या रिकार्डो ब्राऊनला ४-१ अशी धूळ चारून पदकाकडे वाटचाल केली आहे.

ब्राऊनविरुद्धच्या उपउपांत्यपूर्व लढतीत सतीशला डोक्याला आणि हनुवटीला दुखापत झाली. परंतु त्याने हार न मानता ब्राऊनचे आव्हान परतवून लावले. पहिल्या दोन फेरींमध्ये आक्रमण केल्यानंतर तिसऱ्या फेरीत सतीशने बचावावर भर देत ब्राऊनला गुण वसूल करण्याची फारशी संधी दिली नाही. रविवारी होणाऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात ३२ वर्षीय सतीशसमोर उझबेकिस्तानच्या बखोदिर जालालोव्हचे आव्हान उभे ठाकणार आहे. जालालोव्ह हा या वजनी गटातील जागतिक अजिंक्यपद विजेता असून सतीशने आतापर्यंत त्याला एकदाही पराभूत केलेले नाही.

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताकडून पुरुष विभागात उपांत्यपूर्व फेरी गाठणारा सतीश हा पहिलाच बॉक्सिंगपटू ठरला आहे. यापूर्वी भारताच्या मनीष कौशिक, विकास क्रिशन, आशीष कुमार या बॉक्सिंगपटूंना स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला असून अमित पांघल शनिवारपासून आपल्या अभियानाला प्रारंभ करणार आहे.

सतीशने ब्राऊनवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. उपांत्यपूर्व फेरीतील प्रतिस्पर्धी जालालोव्हविरुद्ध सतीशची कामगिरी कधीच चांगली झालेली नाही; परंतु यंदा सतीश उत्तम लयीत असून तो नक्कीच पदक मिळवू शकतो. – सँटिगो निएव्हा, भारतीय बॉक्सिंगचे उच्च कामगिरी संचालक