टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील गुरुवारचा दिवस भारतासाठी सर्वार्थाने ऐतिहासिक ठरला. हॉकीमध्ये तब्बल चार दशकांहून सुरू असलेला पदकदुष्काळ संपुष्टात आणताना भारतीय पुरुष संघाने कांस्यपदकाची कमाई केली. कुस्तीमध्ये भारताच्या रवी कुमार दहियाला सुवर्णपदकावर नाव कोरण्यात अपयश आले. मात्र रौप्यपदक जिंकून भारताचे पदक पंचक साकारण्यात त्याने अमूल्य योगदान दिले.

मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हॉकीतील शिलेदारांनी बलाढ्य जर्मनीला ५-४ असे नेस्तनाबूत केले. त्यामुळे १९८०च्या मॉस्को ऑलिम्पिकनंतर भारताला पदकाचे दर्शन घेता आले. राष्ट्रीय खेळातील या कामगिरीमुळे देशभरात आनंदाचे वातावरण होते.

कुस्तीमधील ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत रशियन ऑलिम्पिक समितीच्या झॅव्हूर युग्येव्हने रवीला ७-४ असे नमवले. त्यामुळे भारताचा ऑलिम्पिकमधील पहिल्या सुवर्णपदकाचा शोध अद्याप कायम आहे. मात्र एकूण पाच पदकांसह भारताने २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमधील सहा पदकांच्या विक्रमाला मागे टाकण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे.

पदकविजेते…

  • मीराबाई चानू (वेटलिफ्टिंग)
  • पी. व्ही. सिंधू (बॅडमिंटन)
  • लवलिना बोर्गोहाइन (बॉक्सिंग)
  • भारतीय पुरुष संघ (हॉकी)
  • रवी कुमार दहिया (कुस्ती)