टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाचा दारुण पराभव झाला आहे. ग्रुप ए मधील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा ७-१ ने पराभूत केलं. भारताचा ऑलिम्पिक इतिहासातील हा लाजिरवाणा पराभव आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ सुरुवातीपासून आक्रमक खेळी करताना दिसला. या सामन्यात भारतीय संघाची बचाव फळी कमकुवत दिसली. पहिल्या दहा मिनिटातच ऑस्ट्रेलियाने १-० ने आघाडी घेतली. त्यानंतर २१ व्या आणि २३ व्या मिनिटाला एका पाठोपाठ एक दोन गोल झळकावले. त्यानंतर भारतीय संघ पूर्णपणे दबावाखाली आला. या संधीचा फायदा घेत २६ व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा गोल झळकावत ४-० ने आघाडी घेतली. पहिल्या सत्रात ४-० ने आघाडी घेतल्याने भारतीय संघ दडपणाखाली आला. दुसऱ्या सत्रातही हे दडपण कायम राहिलं.

दुसऱ्या सत्रात भारतीय संघाला गोल करण्यासाठी चांगलाच घाम गाळावा लागला. भारताच्या दिलप्रीत सिंहने ३४ व्या मिनिटाला गोल झळकावत ४-१ अशा स्थितीत आणला. मात्र त्यानंतर भारतीय संघाला एकही गोल करता आला नाही. ४० व्या आणि ४२ व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाने सलग दोन गोल झळकावले आणि ६-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने ५१ व्या मिनिटाला आणखी एक गोल करत भारताला ७-१ ने पराभूत केलं.

पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला ३-२ ने पराभूत केलं होतं. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून ७-१ ने पराभव सहन करावा लागला. आता भारताचे पुढील सामने स्पेन, अर्जेंटिना, जापान या संघासोबत आहे. आता स्पर्धेतील अस्तित्व टिकवण्यासाठी भारताला हे तिन्ही सामने जिंकणं गरजेचं आहे.