भारतीय महिला थाळीफेकपटू कमलप्रीत कौरच्या पदरी टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत निराशा पडली आहे. थाळीफेक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत तिने अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं होतं. अंतिम फेरीतील १२ स्पर्धकांमध्ये कमलप्रीत कौरला सहाव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. अमेरिकेच्या वॅलेरी ऑलमनला सुवर्ण, जर्मनीच्या के. पुडेन्झला रजत, तर क्युबाचा यमी पेरेजनं कांस्य पदक पटकावलं.
अंतिम फेरीत कमलप्रीतने ६३.७० मीटर लांब थाळी फेकली. तर सुवर्ण पदक विजेत्या वॅलेरी ऑलमॅनने ६८.९८ लांब थाळी फेकली. रजत पदक विजेत्या क्रिस्टन पुडेन्झनं ६६.८६ मीटर लांब, तर कांस्य पदक विजेत्या क्यूबाच्या येमी परेजने ६५.७२ मीटर लांब थाळी फेकली.
#TokyoOlympics: Kamalpreet Kaur finishes sixth in the women’s discus throw final, misses podium finish pic.twitter.com/tMiMOjEbAq
— ANI (@ANI) August 2, 2021
भारताची नॅशनल रेकॉर्ड ब्रेकर कमलप्रीत कौरनं आपल्या कामगिरीतलं सातत्य आणि आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत झोकात अंतिम फेरीत प्रवेश केला होता. अंतिम फेरीसाठीच्या पात्रता फेरीमध्ये कमलप्रीत कौरनं तिन्ही प्रयत्नांमध्ये ६० मीटरच्या वरची कामगिरी केल्यामुळे तिचं अंतिम फेरीतलं स्थान निश्चित झालं होतं. त्यामुळे भारताला टोक्यो ऑलिम्पिकमध्ये अजून एका पदकाची मोठी आशा निर्माण झाली होती..