शारीरिक लवचीकता, हाताच्या चपळ गतीमुळे नीरज यशस्वी!

राष्ट्रीय प्रशिक्षक राधाकृष्णन नायर यांच्याकडून कौतुक

राष्ट्रीय प्रशिक्षक राधाकृष्णन नायर यांच्याकडून कौतुक

नवी दिल्ली : जिम्नॅस्टिक्सपटूप्रमाणे असलेली शारीरिक लवचीकता आणि हाताची चपळ गती, या बलस्थानांच्या बळावर नीरज चोप्राने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकावर नाव कोरले, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षक राधाकृष्णन नायर यांनी व्यक्त केली.

हरियाणाच्या २३ वर्षीय नीरजने २०१९मध्ये उजव्या हातावर झालेल्या शस्त्रक्रियेतून सावरत शनिवारी ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. भारतासाठी अ‍ॅथलेटिक्समधील पहिले आणि देशासाठी वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक जिंकणारा दुसरा क्रीडापटू ठरण्याचा त्याने मान मिळवला. नीरजच्या यशात विदेशी प्रशिक्षक उव होन यांच्यासह नायर यांचाही तितकाच मोलाचा वाटा आहे. २०१५मध्ये राष्ट्रीय स्पर्धेत नीरजचा खेळ पाहून नायर यांनी अ‍ॅथलेटिक्स महासंघाकडे त्याचा राष्ट्रीय शिबिरासाठी समावेश करण्याची विनंती केली होती. तेथून मग नीरजने मागे वळून पाहिले नाही.

‘‘२०१५मध्ये केरळला झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत मी नीरजला प्रथमच पाहिले. त्यावेळी तो अवघ्या १७ वर्षांचा होता. परंतु त्याची लवचीकता आणि हातांची गती अविश्वसनीय होती. त्यामुळे भाला फेकताना तो सहज निर्धारित अंतर सर करायचा,’’ असे नायर म्हणाले.

‘‘नीरजच्या तंत्रावर मेहनत घेणे गरजेचे होते. त्यामुळे मी महासंघाला राष्ट्रीय शिबिरामध्ये नीरजचा समावेश करून जैव-यांत्रिक विशेषज्ञ डॉ. क्लॉस यांना त्याच्याकडे लक्ष देण्यास सांगितले. आज जवळपास सहा वर्षांनी नीरजची गती तशीच आहे. मात्र योग्यवेळी तंत्रावर मेहनत घेतल्यामुळे त्याने ऐतिहासिक सुवर्ण कमावले,’’ असेही नायर यांनी सांगितले. नीरजची आई सरोज आणि वडील सतीश यांनीदेखील मुलाचे कौतुक करताना त्याच्या आगमनाची सर्व जण आतुरतेने वाट पाहात आहोत, असा संदेश दिला.

नीरजचे ऑलिम्पिकनगरीत दणक्यात स्वागत

यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरजचे भारतीय पथकातील अन्य क्रीडापटूंनी ऑलिम्पिकनगरीत धडाक्यात स्वागत केले. भारतीय हॉकी संघातील खेळाडू, कुस्तीपटू आणि अन्य प्रशिक्षक फळी यावेळी उपस्थित होती. नीरजच्या आगमनाच्या वेळी फुलांचा वर्षांव करतानाच खास केक कापून सर्वानी जल्लोष केला.

नीरजवर  ‘अर्थवर्षांव’

’‘बीसीसीआय’ – १ कोटी

’चेन्नई सुपर किंग्ज – १ कोटी

’एलन रिअ‍ॅल्टी ग्रुप – २५ लाख

’इंडिगो कंपनी – पुढील वर्षभरासाठी मोफत विमानप्रवास

’महिंद्रा ग्रुप – एक्सयूव्ही ७०० आलिशान गाडी

’पंचकुला येथील अ‍ॅथलेटिक्स केंद्राचा प्रमुख

’शासकीय विभागात प्रथम श्रेणी अधिकारी पदावर नोकरी

’हरयाणामध्ये सवलतीच्या दरात जमीन

६ – कोटी हरयाणा सरकार

२ – कोटी पंजाब सरकार

२ – कोटी ‘बैजू’ कंपनी

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tokyo olympics 2020 athletics coach radhakrishnan nair praise neeraj chopra zws